वाळूजमहानगर (ता.27) :- वाळुज औद्योगिक परिसरासह मुख्य महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. दरम्यान अपघातास कारणीभूत ठरण्याच्या कारणावरून व वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण कमी होत नसल्याने वाळूज एमआयडीसी पोलिसांनी अचानक अतिक्रमण हटाव मोहीम राबवत अनेक टपऱ्यांचा चुराडा केला. ही कारवाई शनिवारी तारीख 26 रोजी दुपारी करण्यात आली.
वाळूज औद्योगिक वसाहतीतील मुख्य व अंतर्गत रस्त्यासह औरंगाबाद पुणे महामार्गावर गेल्या काही दिवसापासून अपघाताच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे अनेकांचा जीव गेला असून काहींना अपंगत्व आले आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या रस्त्यावरील अतिक्रमणामुळे अपघात होतात. शिवाय चौकाचौकात वाहतूक कोंडी होते.
येथील अतिक्रमण धारकांना अतिक्रमणाबाबत वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण कमी होण्याऐवजी वाढत चालल्याने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे यांनी शनिवारी (ता.26) रोजी अचानक अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेत पंढरपूर येथील तिरंगा चौक ते गुड इयर कंपनी तसेच औरंगाबाद पुणे महामार्गावरील एस क्लब ते पंढरपूर पर्यंतची दोन्ही बाजूचे अतिक्रमण हटवले. त्यामुळे या रस्त्याने मोकळा श्वास घेतला असून वाहतुकीच्या कोंडीसह अपघातही कमी होण्यास मदत होईल. अशी पोलिसांना आशा आहे.
सामानासह टपर्यांचे नुकसान –
याबाबत अतिक्रमण धारकांनी रोष व्यक्त करत म्हटले आहे की, ही अतिक्रमण मोहीम अचानकपणे राबवण्यात आल्याने मालासह अनेक टप्प्यांचे नुकसान झाले. आमचे अतिक्रमण हटवण्याबाबत कल्पना नव्हती. कोणतीही आम्हाला पूर्व सूचना न देता टपऱ्यामधील सामानासहित आमच्या टपऱ्यांचा चुराडा केला. व आमचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. असा आरोप अतिक्रमण धारकांनी केला आहे.
