
वाळूजमहानगर – वाळूजमहानगर परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) व बजाजनगर अशा विविध ठिकाणाहून मुली व विवाहिता अशा 8 जणी बेपत्ता झाल्या. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी वाळूज ठाण्यात मिसिंगच्या तक्रारी दाखल झाल्या झाल्या असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

या प्रकरणातील पहिली घटना अशी की, वर्षा सुभाष अल्हाट (18) रा.जोगेश्वरी ही बुधवारी दहा डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास कॉलेजला जाते असे म्हणून घरातुन निघून गेली. सायंकाळ झाली तरी ती घरी न आल्याने कुटूंबियानी तिचा परिसरात शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही.

दुसरी घटना अशी की, रोशनी सुरेंद्र तिवारी (19) रा.रांजणगाव (शेणपुंजी) ही शुक्रवारी 12 डिसेंबर रोजी सकाळी घरी कोणी नसल्याचे संधी साधुन निघून गेली. ती अद्यापही घरी न आल्याने तीचा परिसरात व नातेवाईकांकडे तसेच मुळ गाव बिहार येथे शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही.

तिसऱ्या घटनेबाबत माहिती अशी की, शुभांगी एकनाथ यादव (23) रा. घनसांगवी ता. जालना ही मिटमिटा येथील फॉर्मसी कॉलेज मध्ये तिसऱ्या वर्षात शिक्षण घेते. तीने लग्न केले असून बजाजनगर मध्ये असल्याचे वडीलांना शनिवारी 13 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास फोन करून सांगितले. त्यानंतर तीच्या वडीलांनी बजाजनगर येथे येऊन शोध घेतला असता ती मिळून आली नाही.
चौथ्या घटनेत लक्ष्मी बबन वाहुळे (20) रा. वरूड, जालना ही मुलासह तीन दिवसापुर्वी बजाजनगर येथे भावाकडे आली होती. रविवारी 14 डिसेंबर रोजी लक्ष्मी कोणाला काही न सांगता घरातून निघून गेली. भावाने तिचा परिसरात तसेच मुळ गावी विचारपुस केली असता तेथेही ती नसल्याचे समजले. म्हणून तीचा नातेवाईकाकडे आजूबाजूला शोध घेतला असता ती कोठेही मिळून आली नाही.

पाचव्या घटनेत आकांक्षा प्रशांत भैरवार (23) रा. रावते मंगल कार्यालय रांजणगाव (शेणपुंजी) ही विवाहिता रविवारी 21 डिसेंबर रोजी पती कंपनीत पगार आण्यासाठी गेल्याची संधी पाहुन घरातून निघून गेली. तीचा आजूबाजूला शोध घेतला असता मिळून आली नाही.

सहाव्या घटनेत विवाहिता सिमरन समीर पठाण (25) रा.कमल गॅस एजन्सीजवळ रांजणगाव (शेणपुंजी) ही सोमवारी 22 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास कोणाला काही न सांगता घरातून निघून गेली. तिचा पतीसह कुटूंबियानी नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही.

सातव्या घटनेबाबत माहिती अशी की, पूजा ज्ञानेश्वर बुधवंत ही 24 वर्षीय विवाहिता रांजणगाव शेणपुंजी येथील रामनगरात पत्ती व मुलासह राहत होती. रविवारी 21 डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ती घरात कोणास काही एक न सांगता निघून गेली. तिचा परिसरात शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही.

आठव्या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, भाग्यश्री रामदास इंगळे ही 19 वर्षीय तरुणी बजाजनगर येथील हायटेक कॉलेजला जाऊन येते. असे म्हणून सोमवारी 8 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास गेली. मात्र ती अद्यापही घरी परतली नाही. तीचा परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही.
या प्रकरणी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या मुली व महिलांचा शोध वाळूज एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार रेखा चांदे करीत आहे.
