वाळूजमहानगर, (ता 22) – वाळूजच्या कलानगर येथील आश्रम शाळेजवळ जियो कंपनीच्या मोबाईल टॉवर उभारण्यासाठी नियमांचे उल्लंघन करून अनधिकृतपणे व नियमबाह्य परवानगी दिल्याचा ठपका ठेवून वाळुज ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच यांच्यासह सर्व पदाधिकारी अपात्र घोषित करण्याचे व तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांच्यावरही शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचे आदेश विभागीय आयुक्त यांनी सोमवारी (ता.20) रोजी दिले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाळूज, ता.गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगरच्या महसुल व भौतिक क्षेत्रातील रामराई रोडजवळील शिवशक्ती कॉलनी, कलानगर, प्राथमिक आश्रम शाळेसमोर, जिओ डिजीटल फायबर लि., अहमदाबाद या कंपनीस नविन टॉवर उभारणीसाठी अनाधिकृत व नियमबाह्य, अनोंदणीकृत कोणताही ग्रामपंचायत ठराव न घेता, कामात अनियमितता, कोणताही करार न करता ग्रामपंचायत दप्तरामध्ये कोणतीही नोंद न करता, शासनाचा कर बुडवून तसेच परिसरातील नागरीकांच्या सुरक्षिततेच्या हेतूने कोणतेही सुरक्षा विषयक परवानगीचे दस्त न घेता व शैक्षणिक संस्थेच्या 100 मिटर परिसरात परवानगी दिली होती. या टॉवरला नागरिकांनी विरोध केल्यामुळे तसेच नागरिक व विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ नये म्हणून कर्तव्यदक्ष नागरिक भैय्यासाहेब भास्कर चव्हाण यांनी 2 डिसेंबर 2022 रोजी संबंधित विभागाकडे तक्रार अर्ज दिला होता. यात असे नमूद करण्यात आले होते की, आश्रम शाळेसमोर, जिओ डिजीटल फायबर लि., अहमदाबाद या कंपनीस नविन टॉवर उभारणीच्या प्रकरणामध्ये सहभागी असलेल्या वाळूज ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्यावर करण्यात यावी. या प्रकरणात विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांनी दोन्ही बाजू तपासून वाळूज ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी अपात्र ठरवत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, 1958 चे कलम 39 (1) अन्वये अपात्र घोषित करण्याचे तसेच तत्कालीन ग्रामविकास अधिकारी नानासाहेब मतसागर यांच्यावरही कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी शिस्तभंगाची कार्यवाहीचे आदेश सोमवारी (ता.20) रोजी दिले.
विभागीय आयुक्त मधुकरराव आर्दड यांनी अपात्र ठरवलेल्या वाळूज ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सरपंच सईदा नबी पठाण, उपसरपंच योगेश दत्तू आरगडे, ग्रामपंचायत सदस्य आमीनाबी इस्माईल पठाण, पोपटराव गोरख बनकर, आशाबी अजीम शेख, राहुल मच्छिंद्र भालेराव, मंजुषा मनोज जैस्वाल, फिरोज नबी पठाण, नम्रता दयानंद साबळे, शेख तोफिक चांद, शमीम शेख जमील अहमद, रंजना सर्जेराव भोंड, विमल काकासाहेब चापे, सचिन अशोक काकडे, कल्पना सुभाष तुपे, युसुफखा महेबुबखा कुरेशी, समिना बेगम अमजद खान पठाण यांचा समावेश आहे.