वाळूजमहानगर, ता.26 (बातमीदार) – वाळूज ते कमळापूर रस्त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी पोटतिडकीने विधानसभेत प्रश्न मांडल्याने व सद्यस्थिती सांगितल्याने आता या रस्त्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. या रस्त्यासाठी 9 कोटी रूपये मंजूर करण्यात आले असून या रस्त्याचे काम 24 मे पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी मंगळवारी (ता.25) विधान परिषदेत दिली.
गंगापूर तालुक्यातील वाळूज-कमळापूर रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेसंदर्भात आमदार सतीश चव्हाण यांनी मंगळवारी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर जडवाहनांची वाहतूक होत असल्याने दीड-दीड फुटाचे खड्डे पडले असून परिसरातील नागरिक, कामगार, विद्यार्थ्यांना रस्त्याने चालतांना अक्षरक्ष: जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. हा रस्ता त्वरित दुरूस्त करणार का?, किती दिवसात दुरूस्त करणार? असे प्रश्न उपस्थित करून आमदार सतीश चव्हाण यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. या प्रश्नाला उत्तर देतांना सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, वाळूज कमळापूर या 4 कि.मी. लांबीपैकी 1 कि.मी. लांबीच्या रस्त्याचे सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्यात येणार असून यासाठी 5.5 कोटी तर 3 कि.मी. रस्ता दुरूस्तीसाठी 3.5 कोटी रू. मंजूर करण्यात आले आहेत. आठ दिवसांमध्ये या रस्त्यावरील मोठे खड्डे बुजवण्यात येतील व मे पर्यंत हा रस्ता पूर्ण केला जाईल. असे मंत्री महोदयांनी सभागृहात सांगितले. यामुळे लवकरच या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या चर्चेत आ.विक्रम काळे यांनी देखील सहभाग घेतला.
