वाळूजमहानगर (ता.22) – वाळूज औद्योगिक वसाहतीतील रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटना वाळूज महानगरच्या वतीने तीन वेळा लेखी निवेदन देऊनही अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली. त्यामुळे मंगळवारी (ता.22) रोजी एमआयडीसी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले.
वाळुज औद्योगिक वसाहतीतील तिरंगा चौक ते गुडइयर टायर कंपनीपर्यंतच्या रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली असून त्वरीत या रस्त्यांचे काम करण्यात यावे. अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने 1 फेब्रुवारी 2022 व 9 मे 2022 रोजी एमआयडीसीकडे करण्यात आली होती. या मागणीची एमआयडीसी अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवल्यामुळे अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने पुन्हा 22 ऑक्टोबर रोजी निवेदन देऊन उपोषणा करण्याबाबत कळविले होते. तरीही एमआयडीसी अधिकाऱ्यांनी निवेदनाची दखल घेतली नाही. त्यामुळे अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने मंगळवारी (ता.22) रोजी सकाळी 11 वाजता एमआयडीसी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. यावेळी अखील भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी मार्कंडे पाटील, उपाध्यक्ष मनोहर सनेर, छावा युवा जिल्हा अध्यक्ष अमोल काळे, नवनाथ काळे, गिरीधर चव्हाण, योगेश सोनवणे, दिनेश आमगे, भैय्या पाटील, भालचंद्र निकम, योगेश गोरे, प्रविण गावंडे, अमोल निमसे, योगेश निलंगेकर आदि कार्यकर्ते उपस्थित होते.