
वाळूजमहानगर, (ता.13) – दगडोजीराव देशमुख महाविद्यालय, बजाजनगर आणि बालकुमार फाऊंडेशन यांच्या वतीने शुक्रवारी (ता.14) रोजी वाळूजमहानगर शालेय काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतून निवडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना थेट मराठवाडा साहित्य संमेलनात मान्यवर लेखकांसोबत काव्य वाचनाची संधी मिळणार आहे.
स्पर्धेतून प्रथम, द्वितीय, तृतीय, दोन उत्तेजनार्थ आणि पाच विशेष उल्लेखनीय अशा एकूण दहा स्पर्धकांची निवड केली जाणार आहे.
विजेत्या स्पर्धकांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुस्तके भेट म्हणून देण्यात येणार आहेत. तर सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. कोणत्याही माध्यमातील पाचवी ते दहावीचे विद्यार्थी काव्य वाचन स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क नसून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. या स्पर्धेसाठी डॉ दिनेश पाटील यांचे सहकार्य लाभले. स्पर्धा शुक्रवार 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता बजाजनगर येथील दगडोजीराव देशमुख महाविद्यालयात होईल. या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन दगडोजीराव देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य राहुल हजारे, संजय सांभाळकर, बालकुमार फाऊंडेशनचे गणेश घुले, अविनाश सोनटक्के, ईश्वर उमाळे, गेणू शिंदे, किरण निकम, कुमार बिरदवडे, मनोज जाधव, चक्रधर डाके, उत्कर्ष आहेर, कुलदीप साबळे, सागर अहिरे, अमोल शिंदे यांनी केले आहे.
