
वाळूजमहानगर, (ता.8) – बेरिंगचे उत्पादन घेणाऱ्या वाळूज औद्योगिक वसाहतीतील एनआरबी बेरिंग्स लिमिटेड या कंपनीला सोमवारी (ता.8) सकाळी सहा वाजेच्या सुमारास भिषण आग लागली. वाळूज एमआयडीसी, गरवारे व मनपा अशा एकूण 4 बंबांनी ही आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज ही मोठी औद्योगिक वसाहत आहे. या औद्योगिक वसाहतीतील ई – सेक्टर मधील प्लाट नं. 71/1/2 सेक्टर येथे असलेल्या बेरिंग्स बनवणाऱ्या एनआरबी बेरिंग्स लिमिटेड या कंपनीला सोमवारी (ता.8) सकाळी सहा वाजेच्या सुमारास भिषण आग लागली. या घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी-1, गरवारे कंपनीच्या 1 व महानगरपालिकेच्या 2. अशा एकुण 4 अग्निशमन बंबाच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण आणण्याचे काम सुरू करण्यात आले.
मात्र चार तासांचा अवधी उलटूनही आग आटोक्यात आलेली नव्हती. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस पोहोचले असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न अद्यापही सुरूच आहेत. या आगीबाबत कंपनी प्रशासनाकडून अत्यंत गुप्तता बाळगण्यात येत असून आग लागल्याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र यात मोठी आर्थिक नुकसान झाल्याचे या आगीवरून दिसून येते.
