वाळूजमहानगर, (ता.10) – वाळूची अवैध वाहतूक करीत असलेल्या विना नंबरच्या हायवा ट्रकने दुचाकी स्वाराला चिरडल्याने त्याचा जागीच चेंदामेंदा होऊन मृत्यू झाला. हा अपघात वाळूज औद्योगिक वसाहतीतील एनआरबी चौक ते वडगाव (को.) रोडवर शुक्रवारी (ता.10) रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वडगाव (को.) येथील प्रल्हाद पुंजाजी बारसे वय 50 वर्ष हे वाळूज औद्योगिक वसाहतीतील एनआरबी चौकातून वडगाव (को.)कडे दुचाकी (एम एच 20,सी व्ही-7994) वरून येत असताना मोकाट जनावरे आडवी आली. त्यामुळे बारसे हे दुचाकीवरून खाली पडले. त्याचवेळी पाठीमागून भरधाव आलेल्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या विना नंबरच्या हायवा ट्रकने बारसे यांना चिरडले. शुक्रवारी (ता.10) रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात त्यांचा चेंदामेंदा होऊन जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाळुज एमआयडीसी पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत बारसे यांचा मृतदेह घाटीत रवाना करून वाळू वाहतूक करणारा हायवा ट्रक ताब्यात घेतला.

हायवा ट्रक बदलल्याची चर्चा –
– अपघातानंतर वाळुज एमआयडीसी पोलिसांसह काही पत्रकारही अपघातस्थळी आले. त्यांनी अपघातग्रस्त हायवाचे व त्यात मधील वाळूतून गळणाऱ्या पाण्याचे फोटो व व्हिडिओ चित्रण केले. मात्र पोलिसांनी या अपघातातील अवैध वाळू वाहतूक करणारा विना नंबरचा हायवा ट्रक बदलून त्याऐवजी डांबर वाहतूक करणारा व (एम एच 46, बी बी -4087) हा नंबर असलेला हायवाट्रक पोलीस ठाण्यात आणून उभा केला. अशी चर्चा वाळूज परिसरात दिवसभर होत होती. याविषयी पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी सांगितले की, सदरील अकस्मात मृत्यू मध्ये चौकशी चालू आहे. चौकशी अंती संबंधित वाहन व चालकावर गुन्हा दाखल केला जाईल.
