March 23, 2026

वाळुज महानगर, (ता.6) – आषाढी एकादशी निमित्ताने वाळुज परिसरातील छोट्या पंढरपुरात विठू माऊलीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने वाळुज येथे रविवारी 6 जुलै रोजी भगव्या ध्वजांचे वाटप करण्यात आले.

यावेळी भगवा ध्वज हा संत तुकारामाचा, संत नामदेवाचा, संत ज्ञानेश्वरांचा, संत नामदेवांचा, संत गाडगेबाबांचा, संत चोखामेळांचा, संत सावता माळी, संत गोरा कुंभार, संत जनाबाई, संत नरहरी सोनार, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई, संत सोपान देव, सर्व संतांचा, सूफी संतांचा आहे. हा ध्वज कुठल्या जाती धर्माच्या विरुद्ध नसून हा समतेचा संदेश देणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शाहू महाराजांचा हा भगवा आहे.

अनेक वर्षापासून चालत आलेली वारीची परंपरा, आषाढी एकादशीची परंपरा, संतांची परंपरा ही समानतेची परंपरा आहे. संतांनी सांगितल्याप्रमाणेच समतेसाठी सर्व वारकरी वारीत पायी चालत विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जातात. लहान मुलांपासून थोरा मोठ्यांना माऊली म्हणत समानतेचे तत्व अंगीकारतात. वाळुज मधील सगळ्या जाती धर्माचे लोक दिंडीत येणाऱ्या वारकऱ्यासाठी फराळाची व्यवस्था करतात. यापुढेही वारीची परंपरा आपल्याला कायम सुरू ठेवावी लागेल. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे माजी खासदार कॉम्रेड क्रांतिसिंह नाना पाटील हे देखील हातात लाल झेंडा घेऊन पंढरपूरला दिंडीत जायचे. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही ही परंपरा सुरू ठेवली आहे. असे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कौन्सिल सदस्य ॲड अभय टाकसाळ यावेळी म्हणाले. या निमित्ताने भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने वारीत येणाऱ्या वारकऱ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सहसचिव एडवोकेट रतन अंबिलवादे, वाळूज शाखा सचिव कॉम्रेड विठ्ठल त्रिभुवन, कॉम्रेड संतोष काळे, कृष्णा बुट्टे, लक्ष्मण बर्वे, लक्ष्मण बागुल, पवन राजपूत, प्रदीप सोनवणे, राहुल साळवे, लक्ष्मण बर्वे, कॉ. राजू हिवराळे आदींची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *