February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.26) – वाळूज परिसरातील सिडको वाळूज महानगर येथे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या बाल संस्कार व युवा प्रबोधन विभागाच्या वतीने आयोजित मूल्यसंस्कार मेळावा व मातृपपितृपूजन सोहळ्याचे उद्घाटन गुरुपुत्र चंद्रकांतदादा मोरे, गुरुपुत्र नितीनभाऊ मोर, आमदार संजय शिरसाठ, आमदार प्रशांत बंब यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (ता.26) रोजी झाले. यात विविध विषयांचे ज्ञानदालने तरुण-तरुणींसह महिला व पुरुषांना प्रमुख आकर्षण ठरत आहे.

प्रथम बजाजनगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरापासून कार्यक्रम स्थळापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये असंख्य महिला व मुला-मुलींनी सहभागी होत हातामध्ये फलक घेऊन समाज प्रबोधन करणारे संदेश दिले. कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर पालकांच्या पाल्यांविषयी असणारे प्रश्न, समस्या व शंकाचे निरसन करणाऱ्या “मूल्यसंस्कारातून पालक व पाल्य सुसंवादाकडे” या महत्वपूर्ण विषयावर गुरुपुत्र चंद्रकांतदादा मोरे यांनी मार्गदर्शन केले.


तरुण-तरुणींना नोकरीच्या संधी उपलब्ध
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवक युवतींसाठी कार्यक्रम स्थळी स्वयंरोजगार विभाग अंतर्गत 70 पेक्षा जास्त कंपनी, संस्थांच्या माध्यमातून अनेक युवक-युवतींना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या सोहळ्यास अनेक शाळेतील विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने भेट दिली.


विविध विषयावरील दालनांचे आकर्षण
कार्यक्रमस्थळी ऋषी-मुनींचे वेद- विज्ञान संशोधनाचे सादरीकरण, सात्विक आहार, निरोगी आरोग्यासाठी मार्गदर्शन, युवकांच्या व्यक्तिमत्व विकासावर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा, करियर, नोकरी या बाबत अचूक मार्गदर्शन, सण-वार- व्रत-वैकल्यांबाबत भारतीय आणि वैज्ञानिक सादरीकरण, दुर्ग संवर्धन कार्य आणि इतिहासामधील शस्त्रांचे प्रदर्शन, पारंपरिक खेळांचे महत्त्व आणि सादरीकरण, मुलांचा सर्वांगीण आणि पंचेंद्रिय विकासावर मार्गदर्शन, आजीबाईच्या बटव्याचे महत्त्व, भारतीय कायद्यांची माहिती, सेवा मार्गातील सामाजिक उपक्रमांचे सादरीकरण व मांडणी अशी अनेक वैविध्यपूर्ण ज्ञानदालन सर्वांसाठी आकर्षक ठरत आहेत.
आरोग्य विषयक मार्गदर्शन
अयोग्य, जीवनशैली व योग्य समुपदेशनाच्या अभावामुळे विविध प्रकारच्या संतती विषयी समस्या झाल्या असून त्यावर अभ्यासपूर्ण विश्लेषण तथा मार्गदर्शन करणाऱ्या “वंध्यत्वातून मातृत्वाकडे” या विषयावर तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन लाभले.

तुलसी विवाह सोहळा
सायंकाळी 5 वाजता गुरुपुत्र श्री आबासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तुलसी विवाह सोहळा संपन्न झाला. भारतीय संस्कृतीमध्ये असलेल्या विवाह संस्काराचे महत्व विशद करताना अनेक महत्वपूर्ण विषयावर आदरणीय श्री आबासाहेब यांचे मार्गदर्शन झाले.
उद्या होणार मातृ पितृ पूजन सोहळा
या कार्यक्रमासह विविध ज्ञान दालनास हजारो नागरिक भेट देत असून सोमवारी (ता.27) रोजी हे ज्ञानदालन सुरू राहणार असून अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे प्रमुख गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मात्र पितृ पाद्यपूजन सोहळा होणार आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *