वाळूजमहानगर, ता.12 (बातमीदार) – वाळूज परिसरात चोरट्यांनी शनिवारी व रविवारी अशा सलग दोन दिवस हायदोस्त घालून लाखो रुपयाचा ऐवज लंपास केला. विशेष म्हणजे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांची बदली होताच नवीन रुजू होणारे पोलीस निरीक्षक गाडे यांना चोरट्यांनी ही सलामी दिल्याचे परिसरातून चर्चिले जात आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शनिवारी (ता.11) रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बजाजनगर येथील श्रीराम मोबाईल शॉपचे शटर उचकटून विविध कंपन्याचे नवीन तसेच रिपोरिंगसाठी आलेले असे एकूण 30 मोबाईल, स्मार्ट वॉच असा अंदाजे दोन ते अडीच लाखाचा ऐवज लंपास केला. तसेच शेजारील न्यु श्री साई मेडिकलच्या गल्ल्यातील रोख 2 हजार तर त्याच्या बाजूला ठेवलेल्या डब्यातील 25 हजार रुपये रोख, परफ्युम, कॉस्मेटिक साहित्य असा 1 लाख रुपयाचा ऐवज चोरून नेला. विशेष म्हणजे चोरट्यांने चेहेरे ओळखू येऊ नये म्हणून मेडिकल मधील सीसीटिव्हीची चिपही चोरून नेली. मात्र मेडिकलच्या बाहेरील कॅमेर्यात तीन चोरटे तोंडला रुमाल बांधलेले दुकानात जातांना दिसले. त्यानंतर
चोरट्यांनी समोरीलच राधा कृष्ण फोटे फ्रेम मेकर्स अॅण्ड जनरल स्टोर व श्री गजानन व्हॉईट लॉन्ड्री येथेही चोरीचा प्रयत्न केला.
रविवारीसुद्धा चोरीचा धडाका –
बजाजनगर येथील प्रसन्ना इंटरप्रायजेसचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी विविध कंपन्याचे महागडे मोबाईल, एलईडी, स्मार्ट वॉच व गल्ल्यातील रोख रक्कम असा ऐवज लंपास केला. या अगोदरही अनेक वेळा चोट्यांनी हेच दुकान फोडून लंपास केला होता. मात्र तरीही या दुकानात कॅमेरे बसवले नसल्याने आश्चार्य व्यक्त केले जात आहे. त्यानंतर लोकमान्य चौकातील मातोश्री मेडिकलकडे मोर्चा वळवत रविवारी (ता. 12) रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास मेडिकलचे शटर उचकटले. यात गल्ल्यात ठेवलेले रोख 10 हजार रुपये व संगणक चोरी गेल्याचे मेडिकल मालकाने सांगितले. या मेडिकल मधील सीसीटिव्ही कॅमेरात दोन चोर कैद झाले. तर बाजूला असलेल्या अग्रवाल कॉमप्लेक्स येथील देवगिरी सुपर मार्कट व देवगिरी स्टील या दोन्ही दुकानाचे शटर उचकटले. मात्र, चोरी न करताच चोरटे तेथून निघून गेले. त्यानंतर चोरट्यांनी सिडको वाळूज महानगरातील अनुश्री किरणा दुकानाचे शटर उचकटून रोख 5 हजार व बाजूला असलेले तुळजाई मेडिकलचे दोन्ही शटर उचकटले. मात्र आत प्रवेश करता न आल्याने ते निघून गेले. त्यांनतर गट नंबर मधील संदिप सातपुते यांच्या कार मध्ये ठेवलेला 40 हजार रुपये किमतीचा लॅपटोप घेऊन चोरटे पसार झाले. घटनेची माहिती मिळताच सपोनि मनोज शिंदे यांच्यासह डीबी पथकाने घटनास्थळी भेट दिली. डॉग स्कॉड व ठसे तज्ञांना ही पाचारण करण्यात आले होते. या चोरीची नोंद एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.