February 5, 2026


वाळुज महानगर, (ता.16) – बेकायदेशीर व अवैधरित्या मोठ्या गॅस सिलेंडरमधून छोट्या गॅस सिलेंडरमध्ये विद्युत मोटार पंपाद्वारे धोकादायकरित्या गॅस भरुन देणाऱ्या दोन अवैध गॅस रिफिलिंग अड्ड्यांवर वाळूज पोलिसांनी छापा टाकून दोघांच्या ताब्यातून जवळजवळ 1 लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी 15 नोव्हेंबर रोजी दुपारी वाळूज येथे करण्यात आली. विशेष म्हणजे हे दोन्हीही अड्डे लोकवस्तीत अत्यंत गजबजलेल्या रहिवासी क्षेत्रात सुरू होते.


याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळूज येथील कमळापूर रोडवरील अत्यंत गजबजलेल्या रहिवासी क्षेत्रातील अण्णाभाऊ साठेनगरात तसेच मधुबन कॉलनी येथे दोन वेगवेगळ्या घरात गॅस सिलेंडरचा साठा करण्यात आलेला असून तेथे अत्यंत धोकादायक व बेकायदेशिररित्या मशीनद्वारे मोठ्या गॅस सिलेंडर मधून छोट्या गॅस सिलेंडर मध्ये अवैध्यरित्या गॅस भरुन विक्री करण्यात येतो. अशी खात्रीलायक माहीती मिळाली. या माहितीवरून वाळुज ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे, पोउपनि. अजय शितोळे, संदिप वाघ, पोलीस अंमलदार समाधान डंगरे, विजय पिंपळे, नितीन धुळे, श्रीकांत सपकाळ, संतोष कटारे, स्वप्नील खाकरे, सुधीर कांबळे यांनी पंचासह तेथे शनिवारी 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान छापा मारला. यात अण्णाभाऊसाठेनगरातील डॉ. बाबासाहेब अंबेडकर पुतळयाजवळच असलेल्या आरोपी रसुल ऊर्फ फिरोज जहांगीर सय्यद (वय 42 वर्ष) याच्या घरात पोलिसांनी झडती घेतली असता घरातील डाव्या बाजुच्या जिन्यात वेगवेळ्या कंपन्याचे छोटे मोठे सिलेंडर, गॅस भरण्याचे छोटी विद्युत मोटार असा मुद्देमाल मिळून आला. तसेच मधुबन कॉलनी येथेही पोलिसांनी छापा मारला असता तेथील गोविंद शेषराव भगत (वय 35) हा सुद्धा अवैधरित्या व बेकायदेशीरपणे मोठ्या सिलेंडर मधून छोट्या सिलेंडर मध्ये गॅस भरून देत असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे दोन्हीही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.


              गॅससह सिलेंडरचा मोठा साठा जप्त –           वाळूज पोलिसांनी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेच्या दरम्यान टाकलेल्या या छाप्यात आरोपींच्या घरातून एचपी कंपनीचे लाल रंगाचे व 14 किलोचे 1 सिलेंडर, 3 हजार रुपयाचे एचपी कंपनीचे लाल रंगाचे 3 रिकामे सिलेंडर, भारत गॅस कंपनीचे 5 किलो वजनाचे 5 सिलेंडर, इंडेन कंपनीचे लाल निळ्या रंगाचे 1 सिलेंडर, विना कंपनीचे लोकल लाल रंगाचे 3 किलोचे 3 रिकामे सिलेंडर, एचपी कंपनीचे 19 किलो वजनाचे मोठे लाल निळ्या रंगाचे 1 गॅस भरलेले सिलेंडर, एचपी कंपनीचे 19 किलो वजनाचे मोठे लाल निळ्या रंगाचे 3 रिकामे सिलेंडर, गो गॅस कंपनीचे 19 किलोचे मोठे लाल रंगाचे 10 गॅस भरलेले सिलेंडर, गो गॅस कंपनीचे मोठे लाल रंगाचे 19 किलो वजनाचे 15 रिकामे सिलेंडर, भारत गॅस कंपनीचे 5 किलो वजनाचे 1 गॅस भरलेले सिलेंडर, एचपी गॅस कंपनीचे 5 किलोचे 9 गॅस भरलेले सिलेंडर, इंडेन कंपनीचे 5 किलोचे लाल निळ्या रंगाचे 8 गॅस भरलेले सिलेंडर, एच पी गॅस कंपनीचे 5 किलोचे 2 रिकामे सिलेंडर, विना कंपनीचे लोकल लाल रंगाचे व 3 किलोचे 26 रिकामे सिलेंडर, 2 इलेक्ट्रिक वजन काटे, 2 विद्युत मोटारसह काळया रंगाचे पाईप, रेग्युलेटर, अडाप्टर असा जवळजवळ 1 लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

          गॅस सिलेंडरचा काळा बाजार जोमात –
वाळूज परिसराची लोकसंख्या सुमारे 5 लाख आहे. त्यातील जवळजवळ सर्वच गॅसचा वापर करतात. त्यामुळे वाळूज परिसरात भारत गॅस, गो गॅस, इंडेन गॅस, एचपी गॅस अशा सर्वच गॅस कंपनीच्या एजन्सी आहेत. या गॅस एजन्सीचे चालक व वितरकांकडून गॅस सिलेंडरचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होतो. गॅस एजन्सीजकडून अव्वाच्यासव्वा किमतीत काळ्या बाजारात गॅस विकला जात असल्याने अवैध गॅस रिफिलिंगचा धंदा वाळूज परिसरात फोफावत आहे. अशी प्रतिक्रिया वाळूज परिसरातून मिळत आहे.
                  मोठ्या दुर्घटनेची शक्यता –
अत्यंत ज्वलनशील असलेल्या या गॅसचा साठा अवैधरित्या केल्या जात आहे. त्यातून बेकायदेशीर व धोकादायकरीत्या गॅस रिफिलिंग केल्या जाते. हा साठा अत्यंत गजबजलेल्या लोकवस्तीतील घरात केल्या जात आहे. हा गॅस रिफिलिंग करताना जर निष्काळजी व हलगर्जीपणा झाला. तर मोठा स्फोट होऊन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *