
वाळूजमहानगर, (ता.30) – वाळूज जिल्हा परिषद सर्कल मधील गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, वंचित बहुजन आघाडी व एम आय एम अशी चौरंगी लढत होत असून येथे दोन अपक्ष यांच्यासह उमेदवार आपले नशीब आजमावत आहे. तर वाळुज गणातून शिवसेना शिंदे गट, शिवसेना उबाठा गट व एम आय एम तसेच लिंबेजळगाव गणात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शिंदे गट व एम आय एम अशी तिरंगी लढत होत आहे. वाळुज गटात एकूण 12 उमेदवार आपले नशीब आजमावत असून त्यांची प्रचार करताना चांगलीच दमछाक होताना दिसत आहे.

वाळुज गट अनुसूचित जातीसाठी राखीव असून या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सेवानिवृत्त पोलीस अधिकारी बालाजी सोनटक्के, भाजपाकडून माजी सरपंच जयकुमार माने, एम आय एम कडून माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल साळवे, आणि वंचित बहुजन आघाडीकडून रूपचंद गाडेकर यांच्यासह शांतीलाल खरात व पूजा नाडे हे दोन अपक्ष असे एकूण 6 उमेदवार नशीब आजमावत आहे. तर वाळुज गणातून शिवसेना शिंदे गटाच्या वतीने ज्योती संतोष आरगडे, शिवसेना उबाठा गटाच्या वतीने आशा संजय शिंदे तर एम आय एमकडून मुमताज कुरेशी लढत आहे.

तसेच लिंबे जळगाव गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संगीता चनघटे, शिवसेना शिंदे गटाच्या वतीने मंगलबाई निळ व एम आय एमकडून साईनाज शेख असे तीन उमेदवार रिंगणात आहे.
वाळुज गटामध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपा युती असून गटाची जागा भाजपाकडे तर वाळूज आणि लिंबे जळगाव या दोन्ही गटाच्या जागा शिंदे सेनेला देण्यात आल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व काँग्रेस अशी आघाडी करण्यात आली असून काँग्रेस पार्टीचे पिंपरखेडा येथील माजी सरपंच नारायण चनघटे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढत आहे. तसेच एम आय एमचे येथे गट आणि गणात 3 उमेदवार आहे. मात्र वाळूज आणि लिंबे जळगाव गणात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार नसल्याने फक्त गटाची एकमेव जागा ते लढत आहे.

उमेदवारांची होताहेत दमछाक –
वाळुज गट हा अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जात असल्याने येथील जिल्हा परिषदेची जागा काबीज करण्यासाठी भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम व वंचित बहुजन आघाडीसह दोन अपक्ष्यांची प्रचार करताना चांगलीच दमछाक होत असल्याचे दिसून येत आहे.
