वाळूजमहानगर, ता.18 – प्रचार संपल्यानंतर घरी जात असताना रस्त्यात वाहनाचा ताफा अडवून वाळूजजवळ तुफान दगडफेक करत झालेल्या भ्याड हल्ल्यात अपक्ष उमेदवार व त्यांचे सहकारी असे एकूण तीन जण जखमी झाले. सोमवारी (ता.18) रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास झालेल्या या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली असून सोनवणे यांची प्रकृती स्थिर असल्याचे कळते.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार डॉ.सुरेश सोनवणे हे सोमवारी (ता.18) रोजी धामोरी बुद्रुक ता. गंगापूर येथे निवडणुकी संदर्भात मित्रमंडळी व नातेवाईकांच्या भेटीगाठी घेण्यासाठी गेले होते.
तेथून परत येत असताना पिंपरखेडा मेहंदीपुर शिवारात अज्ञात 3 जणांनी हात देऊन त्यांची गाडी थांबवली व चर्चा सुरू असतानाच त्यांच्या गाडीवर कपाशीच्या शेतातून दगडफेक करण्यात आली. यात सोनवणे त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली.
रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना जवळच्या दवाखान्यात हलवण्यात आले आहे. या हल्ल्यात (एम एच 20, ई वाय -0008) व (एम एच 15, जे एस -3770) च्या काचा फोडल्या. तसेच सोनवणे यांच्यासह सोबत असलेले जनसंपर्क अधिकारी लक्ष्मण डोळस, नितीन सातपुते हे कार्यकर्ते व चालकालाही मार लागल्याचे समजते.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त नितीन बगाटे, वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने, एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी फौजफाट्यासह सुरेश सोनवणे उपचार घेत असलेल्या खाजगी दवाखान्यात धाव घेत विचारपूस केली. दरम्यान सोनवणे यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. तणावाची स्थिती पाहता मोठा पोलीस बंदोबस्त दवाखाना व वाळूज परिसरात दाखल झाला.
या प्रकरणी वाळुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्यात येईल. असे पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी सांगितले.