
वाळूज महानगर, (ता.28) – दुचाकीवर जाणाऱ्या दोघांना पाठलाग करून चाकूचा धाक दाखवत मारहाण करून 53 हजार रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या त्रिकूटला वाळूज पोलिसांनी 24 तासाच्या आत जेरबंद करून त्यांच्या ताब्यातून मुद्देमालासह गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली.

याबाबत पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांनी दिलेली माहिती अशी की, कपिल नानासाहेब कांबळे वय 33 वर्ष, रा. सैनिकनगर भिंगार ता.जि. नगर हे व चा साला असे दोघे बुधवारी (ता.26) रोजी 8.30 वाजेच्या सुमारास जालनाकडून नगरकडे जात असताना वाळुज पोलीस ठाण्याच्या हद्दीत जिकठाण फाटा येथे 3 अनोळखी इसमांनी पल्सर दुचाकीवरून पाठलाग करत त्यांच्या दुचाकीला आडवी लावून त्यांना मारहाण करुन चाकूचा धाक दाखवत त्यांचे पाकीट, दुचाकी बळजबरीने हिसकावून घेवुन लुटले पळून गेले होते. याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात कलम 394, 341, 34 भादविप्रमाणे गुन्हा दाखल आहे. 
या गुन्हयाच्या तपासामध्ये आरोपी नामे बळीराम ज्ञानदेव रानमाळ वय 27 वर्ष, रा. मांगेगाव, गणेश आण्णासाहेब बनसोडे वय 27 वर्ष, रा. भिवधानोरा व अदित्य कानिफनाथ मावस वय 18 वर्ष. रा. भिवधानोरा ता.गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर यांना निष्पन्न करुन 24 तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणला. तसेच चोरीस गेलेला मुद्देमाल तसेच गुन्हयात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले. 
ही कामगिरी पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस उपआयुक्त दिपक सिन्हें, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वाळुज पोस्टेच्या पोलीस निरीक्षक गिता बागवडे, पोलीस उपनिरीक्षक भगवान मुजगुले, पोलीस हवालदार अभिमन्यु सानप, पोलीस अंमलदार गणेश लक्कस, अरुण घुगरे, तुषार सोनवणे, विजय त्रिभुवन, सुखदेव कोल्हे यांनी केली आहे. आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांनी अशा प्रकारे कोणाला लुटमार केली असल्यास त्यांनी वाळुज पोस्टे येथे संपर्क करावा. असे आवाहन करण्यात आले आहे.
