वाळूजमहानगर – जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने दौलताबाद आरोग्य केंद्रांतर्गत वडगाव (को.) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विकास मिना यांच्या उपस्थितीत अंगणवाडी आणि शाळेतील मुलांना जंतनाशक गोळ्या खाऊ घालत राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा शुभारंभ सोमवारी (ता 10) रोजी करण्यात आला.
यावेळी जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. रेखा भंडारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नागेश सावरगावकर, वैद्यकीय अधिकारी पुष्पलता सावंत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या ज्योती चोरडिया, रेखा नांदुरकर, वडगाव (को.)- बजाजनगरचे सरपंच सुनील काळे, उपसरपंच ज्योती साळे, मुख्याध्यापक सुनील चिपाटे, डॉ.परमेश्वर वाकदकर, सचिन वाघ, आरोग्यसेक राधेश्याम वैष्णव, हरिश्चंद्र रामटेके, मंदा काळे, अनिता राठोड, सोनाली निकम, मंगला गाडेकर, विद्या सोनोने आदींची उपस्थिती होती. बालकांमध्ये जंताचा प्रादुर्भाव झाल्याने रक्तक्षय आणि कुपोषणाबरोबरच बालकांची बौद्धिक आणि शारीरिक वाढ खुंटते. अशा समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून जिल्हा परिषदे आरोग्य विभागाच्या वतीने सोमवारी (ता.10) रोजी जिल्हयात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येत आहे. जंतामुळे अनिमिया, पोटदुखी, उलट्या, अतिसार, मळमळ, भूक मंदावणे, कुपोषण, थकवा व अस्वस्थता आतड्यास सूज येणे. असे परिणाम बालकांवर होतात. एक ते 19 वर्षे वयोगटातील मुला- मुलींमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक असते. ही मोहीम शाळा, अंगणवाडीस्तरावर राबविण्यात येणार आहे. तसेच या मोहिमेपासून वंचित राहिलेल्या आणि शाळाबाह्य बालकांसाठी 17 ऑक्टोबर रोजी गृहभेटीतून आशा वर्कर्समार्फत गोळ्यांचे वाटप केले जाणार आहे.
कशी घ्यावी काळजी –
हात स्वच्छ धुवावेत, शौचालयाचा नियमित वापर करावा, पायात पादत्राणे घालावीत, निर्जंतुक व स्वच्छ पाणी प्यावे, व्यवस्थित शिजवलेला आहार घ्यावा, निर्जंतुक व स्वच्छ पाण्यात भाज्या व फळे धुवावीत, नखे स्वच्छ ठेवावीत.