वाळूजमहानगर, ता.30 – वडगाव (को.) -बजाजनगर येथील शिधापत्रिका धारकांना विविध कारणामुळे स्वस्त धान्य मिळत नसल्याने अनेक तक्रारी वाढल्या होत्या. याबाबत दैनिक सकाळने वारंवार सचित्र वृत्त प्रकाशित करत आवाज उठविल्याने अखेर तहसील कार्यालयाने दखल घेत दुकान नं. 215 हे दुकान नं. 4 ला (जोडले) संलग्न केले. त्यामुळे येथील शिधापत्रिकाधारकांचा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे येथील स्वस्त धान्य दुकानात नियमित वाटप सुरू झाले आहे.
वडगांव (को) बजाजनगर येथील शिधापत्रिका धारकांना वेळेवर राशन न मिळणे, पॉश मशीन बंद असणे, नेटवर्क नसणे, तसेच दुकानासमोर लांबच लांब रांगा लागून गर्दी होणे. अशा वेगवेगळ्या कारणांमुळे स्वस्त धान्य मिळत नव्हते. नागरिकांच्या या गैरसोयीवर आवाज उठवण्यासाठी दैनिक सकाळने दुकान नंबर 215 व नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत सचित्रवृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत तहसील कार्यालयाने केलेल्या चौकशीत संबंधित दुकानदाराने ऑक्टोबर 2024 चे धान्य वाटप करण्यात आले नसल्याचे (ए इ पी डी एस) ऑनलाईन प्रणालीमध्ये तपासले असता आढळुन आले. त्यामुळे दुकान नंबर 215 हे दुकान 4 ला संलग्न करण्यात आले.
पूर्वी वडगांव (को) बजाजनगर परिसरातील रास्तभाव दुकान नं. 215 हे मयत ज्ञानेश्वर लहानुजी खैरे यांच्या नावावर होते. परंतु त्यांचा मृत्यु झाल्या असल्यामूळे हे रास्तभाव दुकान अंजन लक्ष्मण साळवे यांना संलग्न करण्यात आले होते. मात्र अनेक नागरिकांच्या तक्रारी आल्याने तसेच दैनिक सकाळ मध्ये वृत्त प्रकाशित झाल्याने रास्तभाव दुकान नं. 215 यांचे ऑक्टोबर 2024 चे धान्य वाटपाची पडताळणी केली असता वडगांव (को) बजाजनगर येथील शिधापत्रीकाधारकांना ऑक्क्टोबर 2024 चे धान्य वाटप केले नसल्याचे दिसुन येते. ही बाब अतिश्य गंभीर स्वरूपाची असुन रास्तभाव दुकान हे इतर नजीकच्या दुकानास संलग्न करणे योग्य राहिल. म्हणून ज्ञानेश्वर खैरे यांच्या नावावर असलेले रास्तभाव दुकान नं. 215 हे वारस वर्गाची कार्यवाही होई पंर्यत ज्योतिराम एकनाथ जाधव यांच्या रास्तभाव दुकान नं. 248 या दुकानास संलग्न करण्यात आले होते. परंतु ज्योतीराम जाधव यांनी 29 ऑक्टोंबर 2024 रोजी तहसील कार्यालयात अर्ज करून मी अपंग असल्याने धावपळ करू शकत नाही. मी वडगांव (को) येथे धान्यवाटप करू शकत नाही. अशी असमर्थता ज्योतिराम जाधव यांनी दार्शविल्यामुळे दुकान क्रं. 215 हे गोलवाडी येथील दुकान क्रं. 4 ला संलग्न (जोडले) करण्यात आले. तसेच स्वस्त धान्य दुकानचालक रावसाहेब कारभारी धोंडरे यांनी आदेश प्राप्त होताच आदेशानुसार कार्यवाही करावी व जोडलेल्या दुकानात उपलब्ध असलेला धान्य साठा तसेच ई-पॉस मशिन प्राप्त करुन घ्यावी. तसेच रावसाहेब धोंडरे यांनी वडगांव (को.) – बजाजनगर येथेच (पुर्वी ज्या ठिकाणी रास्तभाव दुकान सुरू होते त्याच ठिकाणी) शिधापत्रीका धारकांना नियमित धान्य वितरण करावे व शिधापत्रिकाधारकांची तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी. असे आदेशित करण्यात आले. त्यामुळे रावसाहेब धोंडरे स्वस्त धान्य वाटप करण्यास सुरुवात केली आहे.
प्रतिक्रिया –
सुनीता सोनवणे – माझे राशनकार्ड दुकान नंबर 215 यांचे आहे. यापूर्वी वेळेवर धान्य भेटत नव्हते, राशन आले किंवानाही कळत नव्हते. राशन असले तरी मशीन बंद आहे, नेटवर्क नाही. असे सांगितल्या जात होते. राशनसाठी खूप चकरा माराव्या लागत होत्या. मात्र आता मला व्हाट्सअप ग्रुपवर मेसेज मिळतो. त्यामुळे मी राशन घेऊन येते. शिवाय कोणीही राशन पासून वंचित राहू नये म्हणून विचारपूस होते.
योगेश धस – मी वडगाव येथील सलामपुरे नगरात राहतो. पूर्वी येथील दुकान नियमित सुरू राहत नसल्याने वडगाव को येथे राशनसाठी नेहमी गर्दी असायची. त्यामुळे अनेक जण राशन पासून वंचित राहत होते. इलेक्शन पूर्वी रेशन दुकानावर किट आली होती. ती मिळावी म्हणून अनेक वेळा चकरा मारल्या मात्र ती मिळाली नाही. गेल्या आठ दिवसापूर्वी मात्र मला व्हाट्सअप ग्रुपवर मेसेज आला. त्यामुळे मला रेशन दुकानाचे स्वस्त धान्य मिळाले.
करुणाकर रॉय – मी गेल्या पंचवीस वर्षापासून कार्डधारक असून सिडको वाळूज महानगरात राहतो. हे दुकान पूर्वी खैरे यांच्याकडे होते. त्यावेळी धान्य व्यवस्थित मिळत होते. शिधापत्रिकाधारक सुद्धा कमी होते. मात्र मध्यंतरी दुकानावर नेहमी रांगा असायच्या, गर्दी असायची. त्यामुळे शिधापत्रिका धारकांना ताटकळत उभा राहावे लागत होते. मात्र गेल्या महिन्यापासून हे दुकान नियमित सुरू असते. व्हाट्सअप ग्रुपवर किंवा फोनवर माहिती मिळते. शिधापत्रिका धारकांना चांगली वागणूक मिळते, विचारपूस होते.
सीमा अशोक निकम – मी वडगाव (को.) येथील असून सुरुवातीपासून स्वस्तधान्य दुकानधारक ज्ञानेश्वर खैरे त्यांच्याकडून राशन घेत होते. मात्र त्यांचे निधन झाल्यापासून गावातील कार्डधारक स्वस्तधान्य दुकानापासून फार त्रस्त आहेत. काही दिवसापासून येथील नागरिकांना स्वस्तधान्य दुकानामुळे अडचणीचा सामना करावा लागत आहे. येथे कामगार वसाहत असल्याने रोजगार सोडून स्वस्त धान्याच्या रांगेमध्ये उभं राहावं लागतं. त्यामुळे प्रशासनाने कामगार व गावकर्यांची दखल घेऊन नवीन रेशन दुकानाचा प्रस्तावाला मंजुरीला मान्यता द्यावी.