
वाळुज महानगर, (ता.16) – वाळूज परिसरातील वडगाव कोल्हाटी येथे देशी दारूची विनापरवाना व बेकायदेशिररित्या चोरटी विक्री करणाऱ्या दोघांवर
गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून जवळजवळ 35 हजार रुपये किमतीचा प्रोव्हीबिशन गुन्ह्याचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई 15 जुलै रोजी रात्री 7:45 वाजेच्या सुमारास करण्यात आली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, पोलीस हवालदार योगेश नवसारे, पोलीस अंमलदार मनोज विखणकर, राहुल बंगाळे व पोलिस अंमलदार मंगेश शिंदे असे वाळूज परिसरात अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी मंगळवारी 15 जुलै रोजी गस्त घालत होते. दरम्यान गंगोत्री पार्क येथील योगेश हजबे याच्या पत्र्याचे शेडमध्ये वडगांव कोल्हाटी या ठिकाणी दोन इसम देशी दारू ताब्यात व कब्ज्यात बाळगुन तिची विनापरवाना, बेकायदेशिररित्या, चोरटी विक्री करीत आहे. अशी माहिती मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तेथे 7.45 वाजता छापा मारला असता, तेथे राजदिप लक्ष्मण ठाकुर (वय-28) रा. गंगोत्री पार्क, वडगांव कोल्हाटी, लखन रावण गायकवाड (वय 30) रा. सावित्रीबाई फुलेनगर वडगांव कोल्हाटी असे दोन इसम मिळुन आले.
देशी दारूचा मुद्देमाल जप्त
घटनास्थळी मिळालेल्या आरोपींच्या ताब्यात
संत्रा, भिंगरी देशी दारूचे 9 सिलबंद बॉक्स मिळून आले. या प्रत्येक बॉक्समध्ये 180 एमएलच्या 48 बाटल्या आहेत. व बॉटल प्रत्येकी किंमत 80 रुपये प्रमाणे एकुण 34 हजार 560 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलीस अंमलदार मंगेश शिंदे यांच्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
