वाळूजमहानगर (ता.29) :- न्यायालयाच्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा, व अतिक्रमण धारकांना मालकी हक्क. या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद पश्चिम तालुक्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर 1 डिसेंबर 2022 रोजी धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती एका पत्रकार परिषदेत मंगळवारी (ता.29) रोजी वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद पश्चिम तालुका अध्यक्ष अंजन साळवे यांनी दिली.
यावेळी अंजन साळवे यांनी सांगितले की, जिल्ह्याभरासह संपूर्ण महाराष्ट्रातील अतिक्रमण हटवण्याचा न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. या निर्णयामुळे अनेक गोरगरीब घरांपासून हिरावले जातील व ते रस्त्यावर येतील. त्यामुळे अतिक्रमण काढण्याचा न्यायालयाच्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा व सरकारी गायरानातील अतिक्रमण नियमाकुल करण्यात यावे. तसेच गोरगरिबांनी बांधलेली घरे त्यांच्या नावे करून त्यांना मालकी हक्क, नमुना नंबर 8 किंवा पीआर कार्ड देण्यात यावे. या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 1 डिसेंबर रोजी धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा क्रांती चौक येथून सुरू होणार असून तो जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी 11 वाजता धडकणार असल्याचेही अंजन साळवे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला जिल्हा अधिकारी पी. के. दाभाडे, कोषाध्यक्ष सुगंध दाभाडे, जिल्हा संघटक सिद्धार्थ बनकर, औरंगाबाद पश्चिम तालुका सचिव अरविंद पवार यांच्यासह संदीप ठोकळ, रमेश दाभाडे, किशोर नितनवरे, दिलीप परमेश्वर, सुरेश आहिरे, बाबासाहेब रायकर, शुभम साळवे, नितीन शेजवळ, अक्षय वाघमारे, रोहित महापुरे, अशोक त्रिभुवन, शैलेश गजभिये, अनिल थोरात या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.