वाळूजमहानगर, (ता.15) – दारूच्या नशेत तर्रर होऊन दररोज घरी भांडण करणाऱ्या 34 वर्षीय मुलाचा 50 वर्षीय पित्याने डोक्यात लोखंडी मुसळी घालून खून केला. ही घटना वडगाव कोल्हाटी येथील गट नंबर मध्ये शुक्रवारी (ता 14) रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नारला ता. फुलब्री जि.छत्रपती संभाजीनगर येथील तुपे कुटुंब काम धंद्यानिमित्त वाळूज परिसरात आले. हे कुटुंब वडगाव कोल्हाटी येथील गट नंबर 81 प्लॉट नं. 5 अ येथे राहत असे. कुटुंब प्रमुख विनायक हिमंतराव तुपे (वय 50) हे मजुरी करतात. त्यांचा मुलगा नारायण विनायक तुपे (वय 33) हा दारू पिण्याच्या सवयीचा आहे. तो दररोज दारू पिऊन नसे तर्रर होऊन घरी येत. आणि भांडण करत होता. शुक्रवारी (ता 14) रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास नारायण हा दारू पिऊन घरी आल्यानंतर भांडण करत होता. यावेळी संतापलेल्या विनायक तुपे (पिता) यांनी नारायण याच्या डोक्यात रागाच्या भरात लोखंडी मुसळी मारून त्याचा खून केला. याप्रकरणी हौसाबाई विनायक तुपे यांच्या फिर्यादीवरून आरोपी विनायक हिम्मतराव तुपे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे करीत आहे.
अपघाताचा केला बनाव –
यातील मयत हा मोलमजुरी करत होता. तो नेहमी दारू पिऊन घरी भांडण करत होता. त्यामुळे त्याचा खून केल्यानंतर आरोपी पित्याने रात्रभर त्याचा मृतदेह घरात ठेवला. सकाळी त्याचा अपघात झाला असा बनाव करून घाटीत उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.
घटनास्थळाच्या पाहणीवरून फुटले बिंग-
नारायण तुपे याचा मृत्यू झाल्याची एमएलसी घाटीतून आली. त्यावरून वाळूज एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून चौकशी केली. त्यात विनायक तुपे यांचे बिंग फुटले. आणि नारायण तुपे याचा अपघात नव्हे तर खून झाल्याचा खरा प्रकार समोर आला.
आरोपी अटकेत –
दरम्यान वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील, पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे, पोलीस हवालदार राजाभाऊ कोल्हे, बाळासाहेब आंधळे आदींनी आरोपी विनायक हिमंतराव तुपे याला राहत्या घरातून ताब्यात अटक केली.