February 5, 2026

वाळूजमहानगर, ता.13 (बातमीदार) – तलवारी सारख्या धारदार हत्याराने डोक्यात प्राणघातक हल्ला केल्याने लॉटरी चालक एक जण गंभीर जखमी झाला. जखमीची प्रकृती चिंताजनक असून त्यास घाटीत उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. ही खळबळ जनक घटना वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे शुक्रवारी (ता.13) रोजी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

वाळूज औद्योगिक परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथील मुख्य वर्दळीच्या चौकात लॉटरी चालकांमध्ये तलवारी सारख्या धारदार शस्त्राने हाणामारी झाली. या घटनेत योगेश म्हस्के हा लॉटरी चालक गंभीर जखमी झाला. त्याला गंभीर अवस्थेत प्रथम बजाजनगर येथील खाजगी रुग्णालयात व नंतर पुढील उपचारार्थ घाटीत रवाना करण्यात आले. शुक्रवारी (ता.13) रोजी दुपारी झालेल्या या गंभीर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे व त्यांच्या सहकार्यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच हा हल्ला करून फरार झालेल्या आरोपींचा शोध घेत आहे. याबाबत वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे म्हणाले की, घटनेची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. या हल्ल्याचे नेमके कारण समोर आले नसले तरी लॉटरी व मटक्याच्या वादातून ही हाणामारी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *