
वाळुज महानगर, (ता. 3) – लिंबे जळगाव येथे दोन गटात तुफान राडा झाला. यावेळी काठ्या, चाकू व लोखंडी गजाने मारहाण केल्याने दोन जण जखमी झाले असून एक दुचाकी व एक चारचाकी अशा दोन वाहनांची तोडफोड करण्यात आली. ही घटना बुधवारी 2 जून रोजी रात्री नऊ ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संतोष दिगंबर गवळी (वय 48) रा. लिंबे जळगाव याच्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, आरोपी श्रीकांत संजय पडघन, अंजली लक्ष्मण नाटकर, करण लक्ष्मण नाटकर, अर्चना रामू मनाळ व किरण कचरू जाधव यांनी गैर कायद्याची मंडळी जमा करून बुधवारी 2 जून रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास लिंबे जळगाव येथे संतोष गवळी याला लाकडी दांड्याने व लोखंडी गजाने डोक्यात, पाठीवर, दोन्ही हातात मारून जखमी केले. तसेच संतोष गवळी याची कार (एम एच 20, एफ यू -0131) च्या काचा फोडून नुकसान केले.

तर श्रीकांत संजय पडघन (वय 21) रा. लिंबेजळगाव याने दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, आरोपी संतोष दिगंबर गवळी, दिनेश करडे, ज्ञानेश्वर गवळी, गणेश मोटे व एक अनोळखी यांनी संगणमत करून गैर कायद्याची मंडळी जमवून बुधवारी 2 जून रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास श्रीकांत पडघन व त्याच्या भावास हाताचापटाने मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच लाकडी दांड्याने, चाकूने वार करून जखमी केले. व त्याच्या मावशीच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य करून विनयभंग केला. व मोटरसायकलचे लाकडी दांड्याने तोडून नुकसान केले.
राड्याचे कारण अस्पष्ट –
लिंबे जळगाव येथे बुधवारी रात्री तुफान राडा झाला. या राड्यामध्ये दोन्हीही गटाने संगणमत करून गैर कायद्याची मंडळी जमा करत एकमेकांना जबर मारहाण केली. यावेळी लाठ्या काठ्या, लोखंडी गज व चाकु चा वापर करण्यात आला. या घटनेमध्ये दोन्ही गटाचे दोन जण जखमी झाले असून एक चार चाकी व एक दुचाकी अशा दोन वाहनांची तोडफोड करण्यात आली. या घटनेचे कारण मात्र समजू शकले नाही.
वाळूज पोलीस करताहेत तपास
याप्रकरणी परस्परांच्या फिर्यादीवरून वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी संतोष गवळी, दिनेश करडे, आणि गणेश मोटे तसेच श्रीकांत पडघन, करण नाटकर व किरण जाधव सहा जणांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. रमेश राठोड करीत आहे.
