March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.14) – नवरात्रनिमित्त वाळूजजवळच्या अहिल्यानगर महामार्गावरील लिंबेजळगाव तालुका गंगापूर येथील श्री सप्तशृंगी माता मंदिर देवस्थान येथे 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत भव्य शारदीय नवरात्र उत्सव आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त दर दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

प्रथम सोमवार 22 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता महंत स्वामी कैलासगिरी महाराज, धर्माचार्य ह भ प डॉ जनार्दन महाराज मेटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. नवरात्रात दररोज पहाटे ह भ प कृष्णा महाराज सुकासे यांच्याद्वारे सप्तशती पाठ वाचन, सकाळी 6 ते 8 महाभिषेक व महाआरती, सकाळी 8 ते 10 ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे व्यासपीठ नेतृत्व ह भ प रामनाथ महाराज ठोंबरे जामगाव ता. गंगापूर हे करणार आहेत. दुपारच्या सत्रात 2 ते 4 देवी भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असून ह भ प भागवताचार्य संदीप महाराज चनघटे, पिंपरखेडा ता. गंगापूर हे संगीतमय देवी कथा प्रस्तुत करणार आहेत. सायंकाळी 5 ते 6 आरती व त्यानंतर फराळ होईल.

या उत्सवासाठी दरदिवशी वाळूजचे माजी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मणराव पाठे यांच्यातर्फे पुष्पहार व श्रीफळ सेवा देण्यात येणार आहे. गुरुवार 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 12 श्री सप्तशृंगी माता मंदिर संस्थान लिंबेजळगावचे प. पू. ह भ प विजय महाराज खेडकर यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे. या धार्मिक कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *