February 5, 2026


वाळूज महानगर, (ता.6) – लिंबेजळगाव येथे दसरा सणाच्या दिवशी घडलेली दुर्दैवी घटना अजूनही सर्वांच्या मनावर कोरली गेली आहे. दसऱ्यासारख्या आनंदाच्या दिवशी चार शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली होती. दरम्यान रविवारी 5 ऑक्टोबर रोजी राज्य विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांनी लिंबेजळगाव येथे भेट देऊन मृत मुलांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबीयांना धीर देत त्यांच्या दुःखात सहभागी होत मनःपूर्वक संवेदना व्यक्त केल्या.

यावेळी त्यांच्यासोबत कृष्णा पाटील डोणगावकर, वाळूज शिवसेना विभाग प्रमुख बाळासाहेब चनघटे,
उपतालुकाप्रमुख मनोज पिंपळे, युवासेना वाळूज शहर प्रमुख सौरभ वैद्य, दहेगाव येथील गणेश राऊत, समीर सय्यद, आकाश तारक, रामभाऊ जेवुघाले, नानासाहेब पाचपुते, जळगावचे सरपंच नवनाथ वैद्य, उपविभाग प्रमुख प्रमोद तारक, शाखाप्रमुख दत्तू फरकंडे, भाऊसाहेब पडघन, कल्याण जाधव, निर्फळ भाऊ आदी उपस्थित होते.

याप्रसंगी दानवे दादांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून प्रशासनाला कठोर शब्दांत सुनावले. त्यांनी सांगितले की, “लहान मुलांचा जीव गेला, यामागे केवळ अपघात नव्हे, तर प्रशासनाचे दुर्लक्ष जबाबदार आहे. ज्या ठिकाणी मुरूम उत्खनन करून मोठी खदान तयार झाली. त्या ठिकाणी सुरक्षेची कोणतीही व्यवस्था नव्हती. प्रशासनाने योग्य वेळी कारवाई केली असती, तर ही घटना टळली असती.” या भेटीदरम्यान वातावरण अत्यंत हळहळजनक होते. मृत मुलांच्या कुटुंबीयांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले होते. गावकरीही भावनिक झाले होते. “ही घटना पुन्हा घडू नये, प्रशासनाने तातडीने जबाबदारी निश्चित करावी” अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे. ही घटना केवळ एका गावाची नव्हे, तर संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्याला हादरवणारी ठरली आहे.

अवैध मुरूम उत्खननाने झाली दुर्घटना –
लिंबेजळगाव परिसरात मुरूम माफीयांनी अवैधपणे मुरूम उत्खनन केले. या उत्खननामुळे जमिनीवर मोठी खदान तयार झाली. पावसाळ्यात या खदानीत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. दसऱ्याच्या दिवशी गावातील चार शाळकरी मुले ट्रॅक्टर धुण्यासाठी त्या भागात गेली असता, या खोल खदानीत पाय घसरून ती पाण्यात बुडाली. मदतीसाठी कोणी पोहोचण्यापूर्वीच चारही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

             अवैध उत्खननाकडे दुर्लक्ष –
या दुर्घटनेबाबत गावकऱ्यांनी आरोप केला की, अवैध उत्खननाबाबत वेळोवेळी स्थानिक प्रशासन आणि ग्रामपंचायतीकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, त्याकडे कोणतेही लक्ष दिले गेले नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच आज चार निरपराध मुलांचे प्राण गेले, अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली.
             प्रशासनाविरोधात नाराजी –
या घटनेने गावच नव्हे तर संपूर्ण संभाजीनगर जिल्हा हादरून गेला. मृत मुलांच्या घरात आणि गावात आजही शोकमय वातावरण आहे. गावातील लोक या घटनेबद्दल प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

कायमस्वरूपी उपाययोजना कराव्या –
या भेटीदरम्यान अंबादास दानवे यांनी प्रशासनाने तत्काळ अशा ठिकाणांची पाहणी करून सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, तसेच अशा अवैध उत्खनन प्रकरणांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. शिवाय मृत मुलांच्या कुटुंबीयांना शासनाकडून योग्य आर्थिक मदत आणि न्याय मिळावा, अशीही मागणी त्यांनी केली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *