March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.4) – अटकलेले पैसे काढून देण्यासाठी मागितलेल्या 20 हजाराच्या लाचेपैकी 10 हजार रुपयाची लाच स्वीकारताना वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकास लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने शनिवारी (ता.4) रोजी रंगेहात पकडले. पोलीस ठाण्यातच लावलेल्या सापळ्यात ते अडकल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील एका 42 वर्षीय तक्रारदाराचे पैसे दुसऱ्याकडे अटकले होते. ते पैसे देण्यासाठी त्याने पोलीस ठाण्यात अर्ज केला होता. या अर्जाची चौकशी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मदनसिंग घुणावत यांच्याकडे सोपविण्यात आली होती. हे पैसे काढून देण्यासाठी घुणावत यांनी 20 हजार रुपये लाचेची मागणी केली. त्याचाच पहिला हप्ता म्हणून 10 हजार रुपये देण्याचे शनिवारी (ता.4) रोजी ठरले होते. मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. ठरल्याप्रमाणे सापळा रचला आणि त्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक मदनसिंग घुनावत हे अडकले.

ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, उपअधीक्षक मारुती पंडित, पोलीस निरीक्षक तथा सापळा अधिकारी रेश्मा सौदागर, पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र काळे, पोलीस नाईक शिरीष वाघ, दिगंबर पाठक, पोलीस अंमलदार चांगदेव बागुल यांनी केली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *