वाळूजमहानगर, ता.25- एका 47 वर्षीय लघु उद्योजकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महात्या केल्याची घटना बुधवारी (ता.25) रोजी पहाटे उघडकीस आली. मात्र त्यांच्या आत्महत्येचे ठोस कारण समजू शकले नसले तरी आर्थिक तंगीतून त्यांनी आत्महात्या केल्याचा अंदाज नातेवाईकांतून व्यक्त केला जात आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बालाजी नागनाथ नन्नवारे (वय 47) रा. देवदूत हाउसिंग सोसायटी,बजाजनगर यांनी राहत्या घरातील स्वयंपाकघरात दोरीच्या मदतीने गळफास घेतला. हा प्रकार पहाटे 5 वाजेच्या सुमारास त्यांच्या पत्नीच्या निदर्शनास आला. त्यामुळे पत्नीने आरडाओरड करताच शेजारील नागरिकांच्या मदतीने त्यांना घाटी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत नन्नवारे यांचे वाळूजमध्ये एक छोटेशे शॉप होते. त्यात त्यांना नुकसान झाल्याने आर्थिक तंगीतून त्यांनी आत्महात्या केल्याचा अंदाज नातेवाईकांतून व्यक्त केला जात आहे. त्यांच्या पश्चात दोन मुली पत्नी असा परिवार आहे.