February 5, 2026

वाळुज महानगर, (ता.20) – जम्मू काश्मीर येथे 14 ते 19 नोव्हेंबर दरम्यान आयोजित राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत वाळूज परिसरातील ईश्वरी निलेश सोनवणे हिने तायक्वांदो स्पर्धेत भाग घेत 19 वर्षाखालील मुलींच्या गटात सुवर्णपदक पटकावले. तिच्या या कामगिरीमुळे छत्रपती संभाजीनगरसह वाळुज महानगरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.

जम्मू काश्मीर राज्यात 69 व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन 14 ते 19 नोव्हेंबर 2025 या दरम्यान करण्यात आले होते. या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये देशभरातून अनेक खेळाडूंनी सहभाग नोंदवला. यात महाराष्ट्र राज्याच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज महानगरची ईश्वरी निलेश सोनवणे ही तायक्वांदो क्रीडा प्रकारासाठी प्रतिनिधित्व करत होती. दरम्यान मुलींच्या 19 वर्षाखालील 52 किलो वजनी गटात ईश्वरी हीने आसाम, बिहार, हरियाणा राज्यातील खेळाडूंना मात देत सुवर्णपदक पटकावले. या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकवल्यामुळे गरुड झेप अकॅडमीचे डॉ. सुरेश सोनवणे, प्रा. निलेश सोनवणे, जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे सचिव डॉ. प्रसाद कुलकर्णी यांच्यासह विविध क्षेत्रातून ईश्वरीचे कौतुक केले जात आहे. या स्पर्धेसाठी प्रशिक्षक संतोष बसणेत यांचे तिला मार्गदर्शन मिळाले.

सामन्याचे निकाल:
• फेरी 1 : आयपीएससीवर मात – 2-0
• उपांत्यपूर्व फेरी: हरियाणावर मात – 2-1
• उपांत्य फेरी: बिहारवर मात – 2-0
• प्री-फायनल: आसामवर मात – 2-0
• ग्रँड फायनल: केव्हीएसवर मात – 2-0

प्रतिक्रिया – ईश्वरी सोनवणे,स्वर्ण पदक विजेती –
ही स्पर्धा माझ्यासाठी खूप आत्मविश्वास वाढवणारी होती. कारण राज्याकडून खेळण्याची संधी मला मिळाली आणि त्या संधीचं मी सोनं केलं. प्रतिस्पर्धी हे खूप बलवान खेळाडू होते. परंतु माझा आत्मविश्वास ठाम होता की, मी सुवर्णपदक मिळवेल. यापुढेही देशासाठी खेळण्यासाठी मी तयारी करत आहे.

डॉ. सुरेश सोनवणे, गरुडझेप करिअर अकादमीचे संचालक – ईश्वरीच्या या प्रभावी कामगिरीतून तिची शिस्त, तीक्ष्ण तंत्र आणि मजबूत विजेतेपदाची मानसिकता दिसून येते.

 

प्रशिक्षक, संतोष बसनेत –
“ईश्वरीने या क्षणासाठी अविश्वसनीय परिश्रम घेतले आहेत. जिंकण्याची तिची समर्पण आणि भूक यामुळे महाराष्ट्राला हे सुवर्णपदक मिळाले आहे.”

 

जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सचिव – डॉ. प्रसाद कुलकर्णी – ईश्वरी सोनवणे हीच्या या विजयाचे कौतुक केले. आणि ती एक मोठी कामगिरी आणि तरुण खेळाडूंसाठी प्रेरणा असल्याचे म्हटले.

या विजयाने ईश्वरीने महाराष्ट्राची प्रतिष्ठा उंचावली आहे. आणि भारतातील सर्वात आशादायक तायक्वांदो खेळाडूंपैकी एक म्हणून तिने स्वतःची प्रतिमा निर्माण केली आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तिचे गरुडझेप करिअर अकादमीचे संचालक डॉ. सुरेश सोनवणे आणि प्रा.नीलेश सोनवणे यांनी स्वागत केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *