
बजाजनगर, (ता. 23) – राॅकी पथकाने रामराई येथील दरोडा प्रकरणात प्रारंभी पकडलेल्या दोन गुन्हेगाराकडून आलेल्या माहीतीवरून रामराईच्या घटनेतील आणखी तीन आरोपी वाळूज पोलिसांनी बुधवारी जेरबंद केले. त्यामुळे अटक केलेल्या आरोपींची संख्या आता 5 झाली असून उर्वरित फरारी आरोपीचा शोध सुरू आहे. 
वाळूज पोलिस ठाणे हद्दीतील रामराई शिवारात दिगाबंर वाघमारे यांच्या वस्तीवर रविवार (दि.18) रोजी मध्यराञी पडलेल्या दरोड्यात घरातील सदस्यांना बेदम मारहाण करून त्यात 33 हजाराचा ऐवज लंपास केला होता. याविषयी रामदास वाघमारे यांनी फिर्याद दिलेली आहे. माहीती मिळताच पोलिसांनी चोरट्याच्या शोधकामी घटनेच्या राञीच श्वान पथक घटनास्थळी पाचारण केले होते. त्यात राॅकीने सतीश डोकळे रा.वाळूज याला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या हवाली केले होते.
त्यानंतर दुसर्या दिवशीच्या शोध मोहीमेत राॅकीने पुन्हा जगदिश काळे रा.वाळूज यालाही झडप मारून पकडले होते. दोघांनाही बुधवारी पोलिसांनी तपासकामी न्यायालयात हजर केले होते. दोघांनाही सुनावलेल्या कोठडी दरम्यान दोन्ही आरोपींनी पोपटासारखी पोलिसांना माहीती दिली. त्यात त्यांनी सदर गुन्ह्यात पुढील पाच आरोपीचाही समावेश असल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यात 1) साथीदार धीरज वायरलेस पवार, 2) उडीक ठकसेन काळे, 3) मोहील नवनाथ पवार, 4 ( आदित्य काळे आणि 5) दसल्या काळे यांचेसह चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर वाळूज पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून यापैकी धीरज वायरलेस पवार, उडीक ठकसेन काळे, मोहील नवनाथ पवार सर्व रा.वाळूज या तिघांना बुधवारी (दि.21) रोजी अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून चोरीस गेलेले सोन्याचे 25 मणीही पोलिसांनी जप्त केले आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना न्यायालयाने 25 मे पर्यत 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. घटनेतील उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोनि.अजय शितोळे हे करीत आहे.
