
वाळूजमहानगर, ता.11 – जिजाऊ जन्मोत्सव निमित्ताने वैजापूर येथून मराठा सेवा संघाच्या वतीने दरवर्षी जिजाऊ मातेचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊ रथयात्रा जाते. या वैजापूर ते सिंदखेडराजा रथ यात्रेचे बजाजनगर येथे शनिवारी (ता.11) रोजी जल्लोषात स्वागत करण्यात आले.
प्रथम तिसगाव चौफुलीवरून वडगाव, छत्रपती नगर, मोहटादेवी चौक, जागृत हनुमान मंदिर मार्गे जिजाऊ रथा ची मिरवणूक काढण्यात आली जगतगुरू तुकोबाराय मंदिर परिसरात रथाचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शिवाचार्य ज्ञानेश्वर अंभोरे महाराज, विठ्ठल माकने, शिवाजी थोटे, विजय पाटील, गोविंद जाधव, लिंबराज सोमवंशी, प्रसाद गागरे, दिनेश राऊत, वैशाली गागरे यांनी जिजाऊ रथाचे पूजन करून जिजाऊ मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले.
जिजाऊ रथयात्रा आयोजक मराठा सेवा संघाचे मोती वाघ यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मराठा सेवा संघाचे उपजिल्हाअध्यक्ष मोतीभाऊ वाघ यांनी उपस्थित महिलांना आवाहन केले की येत्या संक्रातीला वाण म्हणून पुस्तके भेट द्या,पुस्तक वाचले की मन, मेंदु, मस्तक तेजोमय होऊन त्याचा प्रकाश आपल्या आयुष्यात नक्कीच होईल. असे ते बोलतांना म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश राऊत यांनी केले. कार्यक्रमाला वैजापूर वरून रथासोबत आलेले 30 ते 40 दुचाकीस्वार यांच्या सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी नवनाथ वाघ, संदीप म्हस्के, अमोल लेकुरवाळे, विशाल गायके, गौरव धुरट, गणेश वाघ, लक्ष्मीबाई जेजुरकर, उज्वला निकम, तनुजा धुराट, दिपाली खैरनार यांच्यासह बजाजनगर येथील मराठा सेवा संघ, संभाजी बिग्रेड, जिजाऊ बिग्रेड, व्यापारी मित्र मंडळ यांनी प्रयत्न केले.
