March 24, 2026

बजाजनगर, (प्रतिनिधी)- राजमाता जिजाऊ माँ साहेब यांची जन्मभूमी मातृतीर्थ सिंदखेडराजा जिल्हा बुलढाणा ते समाधीस्थळ पाचाड (रायगड) पर्यंत काढण्यात आलेल्या अभिवादन यात्रेचे वाळूज महानगरात भव्य स्वागत करण्यात आले. पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात रविवारी 15 जून रोजी दुपारी यात्रेचे आगमन झाले. यावेळी जिजाऊ मातेला अभिवादन करण्यात आले.

महाराष्ट्राची प्रेरणा आणि अस्मिता स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून जन्मस्थळ सिंदखेड येथून ही जिजाऊ महाभिवादन यात्रा काढण्यात येत आहे. 15 जूनपासून सिंदखेड येथून शुभारंभ करण्यात आलेल्या या यात्रेचा समारोप जिजाऊंचे समाधी स्थळ रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथे 17 जून रोजी होणार आहे.

सिंदखेड राजा येथील लखुजीराजे जाधव यांचे वंशज शिवाजीराजे जाधव यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या अभिवादन यात्रेचे वाळूज महानगरात दरवर्षी आगमन होते. याप्रसंगी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी जिजाऊच्या शिल्पास पुष्पहार अर्पण केला. यात्रेचे आयोजक शिवाजीराजे जाधव, समन्वयक विजय काकडे व त्यांच्या सहकाऱ्यांचा मंदिराच्या वतीने याप्रसंगी सत्कार करण्यात आला. या वेळी प्रदीप बोचरे व मंदिर समितीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *