March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.4) – राजकारणाने भल्याभल्यांना पछाडले. त्यामुळे कोण काय करील काहीही सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार वाळूज परिसरात शनिवारी (ता.4) रोजी उघडकीस आला. जोगेश्वरी ग्रामपंचायतच्या दोन जणांच्या कारला संशयास्पद मोबाईल चीटकवल्याचे आढळून आल्याने त्यांनी पोलीसात धाव घेत आमच्या जीवाला धोका असल्याबाबत चार जणांवर संशय घेतला. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सध्या महाराष्ट्रातील राजकारणाने संपूर्ण देशाला वेड लावले आहे. सत्ता मिळवण्यासाठी कोण काय करेल याचा काहीही भरवसा नाही. त्याचीच प्रचिती आज सर्वत्र दिसत आहे. राज्यातील राजकारणाबरोबरच वाळूज परिसरातील जोगेश्वरी येथील राजकारणानेही चांगलाच उच्चांक गाठला आहे. जोगेश्वरी ग्रामपंचायत सदस्यांच्या अपहरणापासून ते अविश्वास ठराव पारित होईपर्यंतच्या सत्तांतराचे महानाट्य चांगलेच रंगले. अविश्वास ठराव पारित झाल्यानंतर या महानाट्यरूपी राजकारणावर पडदा पडेल असे गृहीत होते. मात्र अविश्वास ठराव पारित होऊन सुद्धा राजकारण सुरूच आहे. आता तर हे राजकारण सर्वोच्च शिखरावर पोहचल्याचे दिसून येत आहे. नवीन पदाधिकारी निवडण्यासाठी हालचाली सुरू असताना सुद्धा एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रकार अद्यापही थांबलेले नाहीत.

संशयास्पद मोबाईल आणि घातपाताचा संशय
जोगेश्वरी ग्रामपंचायतचे सदस्य योगेश दळवी व रमेश आरगडे हे नायगाव बकवालनगर येथे राहतात. आरगडे यांच्या घरासमोर शनिवारी (ता.4) काही मुले खेळत होती. त्यांचा बॉल आरगडे यांच्या कार (एम एच 20, सी के – 100) खाली गेला. तो काढत असताना कारला चिगटटेपने चिटकवलेला संशयास्पद मोबाईल एका मुलाला दिसला. तो बाहेर काढल्यानंतर त्यात माजी सरपंच गजानन बोंबले यांचे सिम असल्याचे समजले. म्हणून संशय बळावल्याने योगेश दळवी यांच्या कार (एम एच 20, एफ यु -3619) ची सुध्दा तपासणी केली असता त्यांच्या कारलाही संशयास्पद मोबाईल आढळून आला. त्यामुळे आमच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा हा घातपाताचा प्रकार असावा असा संशय व्यक्त करत योगेश दळवी व रमेश आरगडे यांनी वाळूज पोलीस ठाण्यात धाव घेत जोगेश्वरीचे माजी सरपंच गजानन बोंबले, उपसरपंच प्रवीण दुबिले, ग्रामपंचायत सदस्य किशोर बिलवाल व अमोल लोहकरे यांच्याविरुद्ध तक्रार अर्ज दिला.


हिस्काहिस्कीत मोबाईल पडला
या प्रकाराबाबत जोगेश्वरीचे माजी सरपंच गजानन बोंबले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सदस्यांच्या अपहरणावरून जळगाव येथील हॉटेल समोर आमच्यात हिस्का हिस्की झाली होती. त्यावेळी माझा मोबाईल कार मध्ये पडला, मात्र तो छोटा व अल्प दराचा असल्याने मी परत मागितला नाही.
राजकारणी स्टंट
याबाबत उपसरपंच प्रवीण दुबिले म्हणाले की, हा राजकारणी स्टंट आहे. अविश्वास ठरावाच्या वेळी त्यांना कडक सुरक्षा होती. पोलिसांच्या सायरन वाजणाऱ्या गाड्या मागे पुढे होत्या. अशाच गाड्या नवीन पदाधिकारी निवड होईपर्यंत रहाव्यात. असे त्यांना वाटत असावे. म्हणून त्यांनी केलेला राजकारणी स्टंट आहे.
राजकीय हेतू असावा
याबाबत अमोल लोहकरे म्हणाले की, या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही, त्यांचा विषय वेगळा असू शकतो. राजकीय पोळी भाजण्यासाठी हा त्यांचा प्रयत्न असेल असे म्हणाले.
चौकशी सुरू आहे
जोगेश्वरी ग्रामपंचायतचे माजी सरपंच योगेश दळवी व रमेश आरगडे यांच्या कारच्या खाली डिझेल टाकीजवळ चिगट टेपने चिटकवलेले संशयास्पद दोन मोबाईल मिळून आल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. घातपाताच्या संशयाच्या या प्रकारामुळे वाळूज परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन इंगोले यांना विचारले असता ते म्हणाले की, चौकशी सुरू आहे, चौकशीअंती खरा काय प्रकार आहे, तो उघड होईल.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *