
वाळूज महानगर (ता.28) – वाळूज औद्योगिक परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांना बँकेतील तिजोरी उघडण्यात अपयश आल्याने तिजोरी मोठी रक्कम बचावली. ही चोरीची घटना मंगळवारी 28 ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, रांजणगाव (शेणपुंजी) येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. नेहमीप्रमाणे मंगळवारी 28 ऑक्टोबर रोजी सकाळी बँकेचे कर्मचारी बँक उघडण्यासाठी आले असता,
आतील दरवाज्याचे कुलूप तोडलेले व बँकेतील तिजोरीजवळ अव्यवस्था दिसून आली. त्यामुळे ही माहिती त्यांनी वाळुज एमआयडीसी पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले. श्वानपथक परिसरात चोरट्यांचा मागोवा घेत असून पोलिसांकडून पंचनामा करण्यात येत आहे.
रांजणगाव (शेणपुंजी) येथील अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी झालेल्या या चोरीच्या प्रयत्नामुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे.
