वाळूजमहानगर, ता.24 – रांजणगाव (शेणपुंजी) येथे अपघात मुक्त कार्यशाळेच्या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी परिसरातील अतिक्रमण व विनापरवाना उघडयावर मटण, चिकन व मासे विक्री, त्यातून निघणारी दुर्गंधी, त्यामुळे रस्त्याने ये जा करण्याऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी व नागरिकांना होणारा त्रास, वाढते अपघात. अशा अनेक तक्रारी मांडल्या. विद्यार्थ्यांच्या या तक्रारीची जिल्हा अधिकारी व पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी तात्काळ दखल घेत रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचे आदेश दिल्याने हे अतिक्रमण सोमवारी (ता.20) रोजी तात्काळ काढण्यात आले.
रांजणगाव (शेंपु) येथे मुख्य रस्त्यावर अनेकांनी अतिक्रमण करून व्यवसाय थाटले होते. यामध्ये उघड्यावर चिकन, मटण, मासे विक्री ही मोठ्या प्रमाणात असल्याने या भागात मोठी दुर्गंधी पसरली होती. नागरिकांनी या बद्दल अनेकदा ग्रामपंचायतला तक्रारी केल्या होत्या. ग्रामपंचायतनेही या अतिक्रमण धारकांना नोटीसा बजावल्या होत्या. परंतु ठोस कारवाई केली नाही. परिणामी अतिक्रमणे कमी होण्याऐवजी मोठ्या प्रमाणात वाढली होती. ही सर्व अतिक्रमण केलेली दुकाने मुख्य रस्त्याच्या बाजूला शाळेशेजारी असल्याने महिला, मुली, विद्यार्थी व नागरिकांना या दुर्गंधीचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. यामुळे येथील आरोग्य धोक्यात ही शक्यता आहे. शिवाय या अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाल्याने वाहतुकीची कोंडी होऊन नेहमीच वाद विवाद होत असत. रांजणगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या अपघात मुक्त कार्यशाळेच्या उद्घाटनाला विविध विभागाचे अधिकारी आले त्यांच्यासमोर तक्रारी येताच त्यांनी अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले. त्यामुळे ग्रामपंचायत व पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ अतिक्रमण हटाव मोहीम राबवत रस्त्यावरील विनापरवाना सुरु असलेले चिकन, मटण, मासे विक्री करणारे व इतर लहान मोठ्या टपऱ्या, हातगाड्या, दुकाने जेसीबीच्या साहाय्याने काढून टाकली. विशेष म्हणजे पुन्हा दुकाने लावल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला.