February 5, 2026


वाळुज महानगर – रांजणगाव (शेणपुंजी) येथे राहत असलेल्या मजुरांच्या पाल वजा झोपड्यांना अचानक आग लागून आतील
रोख रक्कमेसह कपडे, भांडे अशा संसार उपयोगी साहित्यासह चार जणांचा घरसंसार जळून खाक झाला. या आगीत सुदैवाने दोन जणांच्या झोपड्या बचावल्या. आगीचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र या घटनेमुळे लहान मुलांसह एकूण 19 जण उघड्यावर पडले आहे. ही घटना सोमवारी 8 डिसेंबर रोजी सकाळी 10:45 वाजेच्या सुमारास घडली.


याबाबत मिळालेली माहिती अशी की, आखाडा बाळापुर ता. कळमनुरी जि. हिंगोली येथील श्यामराव रामा धोत्रे, तुकाराम किसन शिंदे, सुरज लक्ष्मण धोत्रे, शेठीबा किसन शिंदे, विष्णू परशुराम पवार आणि निळा ता. पूर्णा जि. परभणी येथील संजय यल्लाप्पा धोत्रे हे सर्वजण मजुरी काम करतात. हे सर्व 6 मजूर व त्यांचे कुटुंब असे एकूण 29 जण रांजणगाव (शेणपुंजी) येथील पाझर तलावाकाठी एमआयडीसीच्या मोकळ्या भूखंडावर झोपडी वजा पाल टाकून राहतात. त्यात दहा ते बारा लहान मुलेमुली असून ते शाळेत जातात.

सोमवारी 8 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता नेहमीप्रमाणे सर्व मजुरीच्या कामासाठी तर लहान मुले शाळेत गेले होते. दरम्यान त्यांच्या झोपडी वजा पाल येथे कोणीही नसताना 10:45 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत तुकाराम शिंदे यांच्या झोपडीतील गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन आगीने रौद्ररूप धारण केले. पाहता पाहता चार झोपड्यांना आगीने वेढले. आगीची माहिती मिळताच वाळूज अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी धावले. सुमारे पाऊण तासाच्या परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आली. त्यामुळे शेठीबा किसन शिंदे आणि विष्णू परशुराम पवार या दोन्ही मजुरांच्या पाल वजा झोपड्या या आगीतून बचावल्या. मात्र शामराव धोत्रे, तुकाराम शिंदे, संजय शिंदे, सुरज धोत्रे या चार मजुरांच्या झोपड्या संपूर्ण जळून खाक झाल्या.

या झोपड्या मधील संसार उपयोगी साहित्य, अन्नधान्य, अंगावरील व अंथरण्या पांघरण्याचे संपूर्ण कपडे जळून खाक झाले. विशेष म्हणजे त्यांच्या झोपडीतील सर्वांचे मिळून अंदाजे एक लाख रुपयाची रोख रक्कम सुद्धा जळाली. अंगावरील कपड्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे काहीही शिल्लक राहिले नसल्याने या चौघांचाही संसार उघड्यावर पडला आहे. शिवाय थंडीचे दिवस असल्याने त्यांनी काय करावे. असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.


डबडबत्या डोळ्यांनी दाखवल्या जळालेल्या नोटा –
या घटनेची माहिती मिळताच दैनिक नवराष्ट्र च्या प्रतिनिधीने घटनास्थळी भेट देऊन विचारपूस केली असता, मजुरांनी घटनेची माहिती देत डोळ्यातील अश्रूंना आवर घालत डबडबत्या डोळ्यांनी अर्धवट जळालेल्या नोटा दाखवत दाखवल्या. चौघांची मिळून ही रक्कम जवळजवळ एक लाख रुपयांच्या घरात असल्याचे त्यांनी सांगितले.

चार जणांपैकी एकाकडे सिलेंडर –
जळालेल्या झोपड्या मधील तुकाराम शिंदे यांच्याकडे गॅस सिलेंडर होते. मात्र उर्वरित श्यामराव धोत्रे, संजय धोत्रे, सुरज धोत्रे यांच्याकडे गॅस सिलेंडर नसल्याने ते चुलीवरच स्वयंपाक करत असत. या आगीत गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन आग भडकली. मात्र आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

 मोठी जीवित हानी टळली –
ज्यावेळेस या पाल वजा झोपड्यांना आग लागली त्यावेळी सर्व महिला व पुरुष मजूर कामावर गेले होते. तर त्यांची दहा ते बारा मुले शाळेत गेलेली होती. त्यामुळे ते राहत असलेल्या ठिकाणी कोणीही नव्हते. जर ही आग सकाळी, सायंकाळी किंवा रात्री लागली असती. तर मोठी जीवित हानी झाली असती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *