March 23, 2026

वाळूजमहानगर, ता.13 (बातमीदार) – वाळूज उद्योगिक वसाहतीतील रांजणगाव (शेणपुंजी) येथे माऊली इंटरप्राइजेस या किराणा दुकानाच्या गोडाऊनला बुधवारी (ता.12) रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे दोन बंब दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी वा मयत नसल्याचे समजते. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. परंतु गॅस सिलेंडरच्या स्फोटाने किंवा शॉर्टसर्किटने ही आग लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाळूज औद्योगिक वसाहतीतील रांजणगाव (शेणपुंजी) येथील ज्ञानेश्वर नरहरी हिवाळे यांचे जिल्हा परिषद शाळेजवळील न्यू श्रीरामनगरात तीन मजली घर आहे. तळघरात गोडाऊन, त्यावर दुकान व सर्वातवर हिवाळे कुटुंब राहतात. ते बिस्कीटचे स्टॉकिस्ट व किराणा मालाचे होलसेलर आहे. तळघरात (अंडरग्राउंड) मध्ये पतंजली, मरिनो व अन्य बिस्किटचा स्टॉक केलेला होता. माऊली इंटरप्राईजेस असे या गोडाऊन, दुकानाचे नाव आहे. बुधवारी (ता.12) रोजी मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास गोडाऊनला भीषण आग लागली.

आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे राजेश घरत, अनिल देशमुख, कमलाकर सूर्यवंशी, योगेश काळे, संदीप गायकवाड, एस टी मुळे, सचिन उपळेपाटील, सी एस पाटील, राजवीर जाट यांनी दोन बंबासह घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली आहे.

शॉर्टसर्किट किंवा गॅस सिलेंडरच्या स्फोटाने ही आग लागली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. वाळुज एमआयडीसी ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनोद, रांजणगाव चे माजी उपसरपंच अशोक शेजुळ पाटील, कैलास शेवाळे आदींनी यावेळी सहकार्य केले. सुदैवाने या आगीच्या घटनेत कोणीही जखमी वा मयत नसल्याचे समजते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *