February 15, 2025


वाळूजमहानगर, (ता.11) – नागरिकांचा विरोध असून सुद्धा एका पत्र्याच्या शेडमध्ये अवैध देशी दारू दुकान सुरू झाल्याने संतप्त महिला व नागरिकांनी दुकानातील सामानाची तोडफोड करून दारूच्या बाटल्या फोडल्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दारू विकत्यासह अन्य तीन जणान ताब्यात घेतले. ही घटना रांजणगाव (शेणपुंजी) येथील पवननगर येथे सोमवारी (ता. 10) रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली.

रांजणगाव (शे.पु.) येथील कमळापुर वाळूज मुख्य रस्त्यावरील न्यु भारतनगर, हनुमान नगर, मातोश्री नगर या ठिकाणी अवैधरित्या व विनापरवाना देशी दारु विक्री सर्रास सुरु आहे. येथील सुरू असलेली दारू दुकाने बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी अनेकदा केली. विशेष म्हणजे या संबधी ग्रामपंचायतमध्ये ठराव घेऊन प्रशासनाला या संबधी कळविले होते. तरीसुद्धा पवननगर येथे 800 स्क्वेअर फुटापेक्षा जास्त आकाराचे पत्र्याचे शेड उभारून राजरोषपणे देशी दारू विक्री सुरू होती. त्यामुळे संतापलेल्या महिला व नागरिकांनी सोमवारी (ता. 10) रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास दुकानावर चाल करून दुकान बंद पाडले. एवढेच नव्हे तर आतील टेबल खुर्च्या अशा सामानासह दारूच्या बाटल्या फोडल्या. यानंतर परिसरातील ‘सर्व अवैध दारू दुकाने बंद करा’ अश्या घोषणा दिल्या. दुकान सुरू झाल्यास रस्ता रोको आंदोलनाचा इशाराही देखील संतप्त नागरिकांनी दिला. घटनेची माहिती मिळताच वाळुज एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक रामेश्वर गाडे, सपोनि. संयज गिते, पोअ योगेश शेळके, नितिन इनामे, मनमोहनमुरली कोलमी, गणेश सागरे आदिंनी घटनस्थळी धाव घेत जमावास शांत केले. त्यानंतर अवैध दारू विक्रते अविनाश पिंपळे अन्य तीन जणांना ताब्यात घेतले. दरम्यान रांजणगाव (शेणपुंजी) येथील वातावरण तणावग्रस्त झाले होते.
पोलीस निरीक्षक गाडे यांचे आवाहन –
अवैध रित्या काही प्रकार परिसरात सुरू असतील तर पोलिसांना माहिती द्या. त्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यईल. मात्र कायदा हातात घेऊ नका. असे आवाहन वरिष्ठ निरिक्षक रामेश्वर गाडे यांनी केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *