February 24, 2025

वाळूजमहानगर, (ता.21) – गेल्या अनेक वर्षापासून अतिक्रमण करून ठाण मांडून बसलेल्या विविध व्यावसायिकांच्या अतिक्रमणावर रांजणगाव (शेणपुंजी) ग्रामपंचायतने सोमवारी (ता.20) रोजी हातोडा टाकून जवळजवळ 200 ते 250 जणांचे अतिक्रमण निष्कासित केले. परिणामी या रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. शिवाय नागरिक, कामगार व वाहनधारकांची गैरसोय दूर झाली आहे.

वाळूज औद्योगिक वसाहतीत ये जा करण्यासाठी वाळूज ते रांजणगाव (शेणपुंजी) हा रस्ता अत्यंत जवळचा शॉर्टकट आहे. साठ फूट रुंद असलेल्या या रस्त्यावर हातगाड्या, टपऱ्या, पत्राचे शेड, ओटे तसेच भिंत बांधून पक्क्या स्वरूपाचे अतिक्रमण केले. गेल्या 12 ते 13 वर्षापासून अनेक व्यवसायिकांनी अतिक्रमण करून ठाण मांडून बसले होते. त्यामुळे हा रस्ता अत्यंत अरुंद झाला होता. रस्त्यात लागलेल्या हातगाड्या, पाणटपऱ्या, भाजीपाला, फळ विक्रेते यांची दररोज होणारी तोबा गर्दी तसेच ये जा करणाऱ्या नागरिकांची वर्दळ. यामुळे वाळुज औद्योगिक वसाहतीत ये जा करताना कामगारांना, नागरिकांना, वाहनधारकांना दररोजची डोकेदुखी होत होती. त्यामुळे वाळूज ते कमलापूर रोडवरील अतिक्रमण हटवण्यात यावे. अशी वारंवार मागणी होत होती. शिवाय वाळूज ते कमळापूर रस्त्याचे कामही रखडले होते. त्यामुळे अखेर रांजणगाव ग्रामपंचायत, पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य यांनी बैठक घेऊन अतिक्रमण मोहीम राबवण्याचे ठरवले. आणि सोमवारी (ता.20) रोजी या अतिक्रमणावर हातोडा टाकला. दिवसभर सुरू असलेल्या या अतिक्रमण हटाव मोहिमेत विविध हातगाड्या, टपऱ्या, पत्राचे शेड, ओटे, पक्क्या भिंती. असे जवळजवळ 200 ते 250 जणांचे अतिक्रमण हटवण्यात आले. यावेळी सरपंच योगीता प्रभाकर महालकर, उपसरपंच शिवराम ठोंबरे, ग्रामविकास अधिकारी गणेश धनवई, पंचायत समिती सदस्य दिपक बडे, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर महालकर, ग्रामपंचायत सदस्य दत्तु हिवाळे, नंदीनी संतोष लोहकरे, पंकज हिवाळे, कविता बाबुराव हिवाळे, सय्यद सायराबानो जावेद, साईनाथ जाधव, अशोक जाधव, कांताबाई आशोक जाधव, संजीवनी दिपक सदावर्ते, मोहनीराज धनवटे, संदीप मनोहरे, अश्विनी कैलास हिवाळे, सत्यशिला शहाजी सुरुंग, नंदाबाई हरेराम बडे, निर्मला बबन पठाडे, भिमराव कीर्तीकर आदींची उपस्थिती होती.

सूचना देऊन केले होते आवाहन –
हे अतिक्रमण हटवण्यापूर्वी रांजणगाव ग्रामपंचायतने अतिक्रमणधारक व्यापाऱ्यांना तसेच लहान मोठ्या व्यावसायिकांना स्वतःहून आपापले अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन केले होते. मात्र त्यास कोणीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे ही मोहीम राबवून अतिक्रमण हटवण्यात आले.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त –
वीस ते पंचवीस ग्रामपंचायत कर्मचारी, एक जेसीबी, दोन ट्रॅक्टरच्या सहाय्याने ही अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली. दरम्यान वाळुज एमआयडीसी पोलीसचा तगडा बंदोबस्त यावेळी तैनात करण्यात आला होता.

सिमेंट रस्ता व दोन्ही बाजूने नाल्या
वार्ड क्रमांक सहा मध्ये येणारा हा रस्ता जवळजवळ एक किलोमीटरचा आहे. दोन्ही बाजूने नाल्या व अंदाजे 30 ते 35 फूट रुंद असा हा सिमेंट काँक्रेटचा रस्ता करण्यात येणार आहे. त्यासाठी ही अतिक्रमण मोहीम राबवली. यामुळे येथील नागरिक, कामगार व व्यावसायिकांची सुविधा होणार असून अपघाता सारख्या घटना टाळणार आहे. अशी माहिती सरपंच योगिता महालकर व उद्योजक प्रभाकर महालकर यांनी सकाळची बोलताना दिली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *