वाळूजमहानगर (ता.14) : – रांजणगाव (शेणपुंजी) येथील श्री संत सावता महाराज मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सोमवारी (ता.14) रोजी सुरुवात झाली आहे. विविध धार्मिक कार्यक्रमासह अनेक सामाजिक उपक्रम या सप्ताहात राबविण्यात येत आहे. या सप्ताहाची सांगता सोमवारी (ता.21 )रोजी होणार आहे.
राष्ट्रसंत श्री गाडगेबाबा यांचे अनुयायी श्री संत रामलाल बाबा व सौ गेंदा आई भोपळे महाराज यांनी श्री संत सावता मंदिर, रांजणगाव (शेणपुंजी) येथे 85 वर्षांपूर्वी सुरू केलेला हरिनाम सप्ताह परंपरा त्यांच्या पश्चात आजही चालू आहे.
याचाच एक भाग म्हणून सोमवारी (ता.14) रोजी हरिनाम सप्ताहास श्री संत भोपळे महाराज यांचे शिष्य ह.भ.प. श्री सुखलाल महाराज पैठणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला. कार्यक्रमाची सांगता सोमवारी ता.21 रोजी ग्राम प्रदक्षिणा व दहीहंडी फोडून होईल. दररोज पहाटे 4 वाजता भूपाळी व हरिपाठ, दुपारी 12 वाजता भक्त विजय ग्रंथ प्रवचन व सायंकाळी 4 वाजता पंचपदी, पावली व ह भ प श्री सुखलाल महाराज यांचे किर्तन होईल. या सप्ताहामध्ये श्रमदान, रक्तदान,अन्नदान, अंधश्रद्धा निर्मूलन व व्यसनमुक्तीपर जनजागृती, सामाजिक व शैक्षणिक पुरस्कार वितरण असे समाज उपयोगी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन सप्ताह आयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.