वाळूजमहानगर, (ता.18) – दोन गटात हाणामारी सुरू असून तलवार वापरली जात आहे. अशी माहिती मिळताच वाळुज एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत एक धारदार तलवार जप्त करून दोघांना अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (ता.17) रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास रांजणगाव (शेणपुंजी) येथे केली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रांजणगाव शेणपुंजी येथील मंगलमूर्ती कॉलनीत दोन गटात हाणामारी सुरू आहे. या मारहाणीत तलवार वापरली जात आहे. त्यामुळे अनुचित प्रकार घडू शकतो .अशी माहिती वाळूज एमआयडीसी पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता तेथे आरोपी कृष्णा भास्कर चक्रे (वय 26) रा. पवननगर, रांजणगाव (शे.पु.) ता. गंगापुर जि. छञपती संभाजीनगर व सचिन भुजंगराव मिसाळ (वय 27) वर्षे रा. ओमसाईनगर, रांजणगाव (शे.पु.) ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर हे आप-आपसात मारामारी करुन दंगल करतांना दिसले. पोलिसांनी कृष्णा भास्कर चक्रे याच्या हातातून तलवार हीसकावून घेतली. 32 इंच लांब, 1 इंच रुंदीचे पाते व स्टीलची मूठ असलेली ही 300 रुपये किमतीची तलवार पोलिसांनी जप्त करून दोघांनाही अटक केली.
याप्रकरणी सुरेश कचे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात कलम 160 भादंवि सहकलम 4/25 भारतीय हत्यार कायदा व सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.