February 23, 2025

वाळूजमहानगर, ता.11 – वाळुज औद्योगिक परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) परिसरात वाळुज एमआयडीसी पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवत तीन जणांना अटक करून 2 हजार 200 रुपये किमतीच्या दोन धारदार तलवारी जप्त केल्या. ही कारवाई रविवारी (ता.10) रोजी रात्री करण्यात आली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वाळूज एमआयडीसी पोलिसांनी रांजणगाव (शेणपुंजी) येथे रविवारी रात्रभर कोंबिंग ऑपरेशन राबवले. या दरम्यान अंधाराचा फायदा घेत आपले अस्तित्व लपवून काहीतरी गंभीर स्वरुपाचा गुन्हा करण्याच्या इराद्याने रांजणगाव शेणपुंजी येथील बस स्टँडच्या पाठीमागे 22 वर्षीय सौरभ संतोष लोहकरे रा. जामा मस्जिदजवळ रांजणगाव हा रात्री 11 वाजेच्या सुमारास मिळून आला. तसेच ईश्वर जनार्धान खरात (28), रा. पवननगर, रांंजणगाव हा रात्री 12 वाजेच्या सुमारास कमळापूर रोड वर काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने अंधारात धारदार तलवार घेऊन उभा असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यास झडप घालून पकडून त्याच्या ताब्यातून 1 हजार 200 रुपये किमतीची धारदार तलवार जप्त केली. याशिवाय मंगलमुर्ती कॉलनी येथे विरप्रकाश रोहीदास जामीनकर (26) अंधारात उभा असलेला रात्री 12.15 वाजेच्या सुमारास आढळून आला. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ 1000 रुपये किमतीची धारदार तलवार मिळून आली. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशावरून वाळुज एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, शेख सलीम, दिनेश बन, पोलीस हवालदार बाबासाहेब काकडे, सुरेश भिसे यांच्या पथकाने केली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *