February 21, 2025

वाळूजमहानगर, ता.10 – वाळूज औद्योगिक परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे
देशी दारू, सोरट असे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफावले आहे. परिणामी या परिसरात मारामाऱ्या करणे, धमकी देणे, महिला, मुलींकडे वाईट नजरेने पाहणे, त्यांची छेड काढणे, हातवारे करणे, नशाकरुन गाडी चालवणे. असे प्रकार वाढले आहेत. दररोज घडणाऱ्या या घटनांना कंटाळून ग्रामपंचायतने येथील अवैध धंदे बंद करण्या बाबतचा ठराव घेतला आहे.


वाळूज औद्योगिक वसाहतीमुळे रांजणगाव (शेणपुंजी) येथील लोकसंख्या लाखाच्या घरात आहे. अत्यंत घनदाट नागरी वसाहत असलेल्या या गावात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढले. कधीकाळी गल्लीबोळात असलेले हे अवैध धंदे मुख्य रस्त्यावर तसेच चौकाचौकात थाटले आहे. विशेषत: येथील कमळापूर मुख्य रस्त्यावरील हनुमाननगर व मातोश्रीनगर तसेच कमळापुर फाटा येथे अनाधिकृतपणे देशी दारुचे व सोरटचे अवैध दुकाने रासरोसपणे चालु आहेत. या भागातील अनाधिकृत देशी दारु विक्री व सोरट व्यवसाय हे सर्व रहीवाशी क्षेत्र (नागरी वसाहतीत) आहे. दुकानासमोर अनेक उपद्रवी थांबलेले असतात. त्यांचा त्रास शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला, तरुणमुली या सर्वांनाच सहन करावा लागत आहे.
मारामाऱ्या, धमक्या देणे, लूटमार करणे. घटना नित्याच्याच झाल्या आहे.
शाळेजवळच देशी दारू विक्री
रांजणगाव येथील शाळा, मंदिर, मश्जिद आशा शैक्षणिक व धार्मिक स्थळाजवळच अवैध धंदे चालकांनी काही दुकाना थाटल्या असल्यामुळे त्या ठिकाणी देशी दारु विक्री व्यवसायीकांचा व देशीदारु सेवन करणा-यांचा त्रास ये-जा करणा-या विद्यार्थी, विद्यार्थिनी होतो. तसेच महिला, मुली यांचेकडे वाईट नजरेने पाहणे, त्यांची छेड काढणे, हातवारे करणे. असे प्रकारही घडतात. त्यातून अनुचित प्रकार, गुन्हे घडलेले आहे व यापुढेही घडण्याची शक्यता आहे.
कायमस्वरूपी बंद करावे
या अवैध धंद्यामुळे रोजंदारींवर काम करणारे अनेक कामगार पैशाच्या मोहापाई रोजगार बुडवून सोरट खेळतात. त्यात ते कफलक होतात. त्यामुळे ते मानसिक ताण तणावात येतात आणि दारूच्या दुकानाकडे वळतात. तसेच देशी दारु पिणा-यांमुळे छेडछाडीच्या प्रकारासह नशेत वाहन चालवणे, अपघात होणे. त्यातून बाचाबाची, मारामारी असे अनुचित प्रकार होऊन गावातील वातावरण अत्यंत संवेदनशील होत आहे. हे प्रकार थांबविण्याकरीता गावातील अनाधिकृत देशी दारुचे दुकाने व इतर अवैध धंदे कायमस्वरुपी तात्काळ बंद करण्यात यावे.
कटकटींना कंटाळून घेतला ठराव –
रांजणगाव येथील गावगाडा ग्रामपंचायतच्या माध्यमातून चालतो. येथील अवैधंद्यांमुळे ग्रामपंचायतकडे सतत निवेदन व तक्रारी येतात. त्यामुळे होणाऱ्या कटकटींना कंटाळून ग्रामपंचायत रांजणगाव (शेपुं.) येथील मासिक सभा पुर्वसुचनेनुसार सरपंच योगिता प्रभाकर महालकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी रोजी सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत कार्यालयात अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्याचा हा ठराव घेण्यात आला. विषय क्र. 11 व ठराव क्र. 11 – असलेल्या या ठरावास सुचक म्हणून ग्रामपंचायत सदस्या नंदाबाई हरेराम बडे या आहेत. तर ग्रामपंचायत सदस्य भिमराव फकीरराव किर्तीशाही यांनी अनुमोदन दिले.
संबंधितांना पाठवल्या प्रतिलिपी
ग्रामपंचायतच्या मासिक सभेत उपस्थित असलेल्या सर्व सदस्यांच्या संमतीने घेण्यात आलेल्या या ठरावाच्या प्रती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक व पोलीस आयुक्तालय, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे पाठविण्यात याव्या. बाबतसुद्धा उपस्थितांमध्ये सविस्तर चर्चा होऊन एकमत झाले. व ठराव सर्वानुमते पास करण्यात आला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *