वाळूजमहानगर, (ता.20) :- विकास कामात अडथळा नाही, मात्र काम करताना ते दर्जेदार झाले पाहिजे. या एकमेव मागणीसाठी येसगाव येथील शेतकरी व गावकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचा तीव्र निषेध व्यक्त करत रस्त्यावर उतरून रविवारी (ता.19) रोजी आंदोलन केले.
याबाबत शेतकऱ्यांनी दिलेली माहिती अशी की, सार्वजनिक बांधकाम विभाग औरंगाबाद पश्चिम अंतर्गत तुर्काबाद, राजुरा, येसगाव मार्गे घोडेगाव, तांदुळवाडी या 19 किलोमीटर रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र हे काम करताना सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदार हे मलिदा लाटण्यासाठी दर्जाहीन काम करत आहे. 
वाळूज औद्योगिक वसाहत जवळ असल्याने या रस्त्यावरून जवळजवळ दहा ते पंधरा गावातील तरुण, कामगार वाळूज औद्योगिक वसाहतीत कामासाठी ये जा करतात. शिवाय परिसरातील शेतकरी व गावकऱ्यांसाठी हा एकमेव रस्ता आहे. त्यामुळे शेतीमालासह बाजारहाट करण्यासाठी याच रस्त्याचा वापर होतो. हा रस्ता अत्यंत खराब झाल्यामुळे रस्त्या अभावी परिसरातील शेतकरी व गावकऱ्यांची अत्यंत गैरसोय होत होती. अनेक वेळा मागणी केल्यानंतर या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदार या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट करत आहे. शिवाय पाण्याचा ओघ लक्षात घेता राजुरा व येसगाव या दोन ठिकाणी मोठ्या फुलांची आवश्यकता असतानाही केवळ नळकांडी फुल करण्यात येत आहे. तसेच काही ठिकाणी कमी जास्त रुंदीचा हा रस्ता करण्यात येत आहे. असा आरोप परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे पुढे पाट मागे सरसपाट अशी गत या रस्त्याची होणार आहे.

विकास कामात अडथळा नाही, मात्र काम करताना ते योग्य प्रकारचे व दर्जेदार झाले पाहिजे. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून परिसरातील शेतकरी व गावकऱ्यांनी राजुरा, येसगाव रस्त्यावर उतरून संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागा विरोधात घोषणाबाजी करत रविवारी (ता.19) निषेध आंदोलन केले. यावेळी माजी सरपंच भराड पाटील येसगावकर, गंगापूर पंचायत समितीचे माजी सभापती दिलीपसिंग राजपूत, तुर्काबादचे माजी जिल्हा परिषद सदस्य अंकुश जाधव, राजूराचे उपसरपंच लक्ष्मण सावंत, येसगावचे ग्रामपंचायत सदस्य गोरख दिवटे, गणेश बोबडे, साहेबराव बोबडे, भानुदास जाधव, योगेश जाधव, आबासाहेब जिवरक, दत्ता चानगुडे, बाळासाहेब शेळके,
नामदेव पवार, अंकुश पाटेकर, घोडेगावचे शिकंदर पहिलवान, शेषराव पाटेकर, गणेश दिवटे, साईनाथ जाधव आदींची उपस्थिती होती.
