वाळूजमहानगर, ता.16 (बातमीदार) – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी समारोपीय मार्गदर्शन करताना मराठवाड्याला समन्यायी पद्धतीने पाणी वाटप झाले पाहिजे. अशी आग्रही मागणी केली. तसेच पाणी वाटपात मराठवाड्यात होत असलेला अन्याय सहन करणार नाही, आम्ही अन्याय करणाऱ्यांना पाणी पाजू असा इशारा दानवे यांनी दिला. मराठवाडा साहित्य संमेलन म्हणजे हा समाजाचा आरसा आहे. मराठवाड्यातील साहित्य संमेलन हे समाजाच्या व्यथा मांडणारे, मराठवाड्यातील समस्यांना वाचा फोडणारे असून हे संमेलन मराठवाड्यातील मातीचे प्रतीक असल्याचे नमूद करत मराठवाड्यातील साहित्य व संस्कृतीचे दर्शन घडविणारे हे संमेलन असल्याचे प्रतिपादन करत या संमेलनातून मराठवाड्याच्या विकासाला दिशा व चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
बजाजनगर येथे रविवारी (ता.16) रोजी सायंकाळी स्व. विलासराव देशमुख साहित्य नगरीतील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचार पीठावर समारोपीय कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. संमेलनाचे अध्यक्ष डॉ.भीमराव वाघचौरे हे अध्यक्षस्थानी होते. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह डॉ.दादा गोरे, सहकार्यवाह डॉ.गणेश मोहिते, संमेलनाचे स्वागताध्यक्ष विजय राऊत, प्राचार्य विलास राऊत, शिवानी राऊत, प्राचार्य राहुल हजारे, उपप्राचार्य डॉ. संजय सांभाळकर, विवेक जैस्वाल, मनीष जैस्वाल, आदींची विचारपीठावर उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य राहुल हजारे यांनी केले. मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह डॉ. दादा गोरे यांनी संमेलनात घेतलेल्या ठरावाचे वाचन केले. म.सा.प. चे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी संमेलन यशस्वी झाल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले.
संमेलनाध्यक्ष डॉ.भीमराव वाघचौरे यांनी इतर साहित्य संमेलनात मोठे वाद होतात. परंतु मराठवाडा साहित्य संमेलन दरवर्षी वादरहित होते. याकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. संमेलन आयोजकांनी कर्तव्यात माणुसकी ओतली यामुळे मानवता तयार झाली व हे दिमाखदार साहित्य संमेलन उत्साहात झाले. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून साहित्य रसिकांना साहित्याची ही मेजवानी घेता आली. असे गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.समाधान इंगळे यांनी केले तर डॉ.युवराज धबडगे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने संमेलनाचा समारोप करण्यात आला. या कार्यक्रमास साहित्य रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.