वाळूजमहानगर, (ता.7) -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह चार-पाच आमदार जेलमध्ये टाकायचे, 25, 30 आमदार फोडून भारतीय जनता पार्टी कमजोर करायची. आणि महाविकास आघाडी मजबूत करायचे कारस्थान रचले जात होते. आणि या एकनाथ शिंदेला सुद्धा राजकारणातून संपवायचे हा देखील या कारस्थानाचा भाग होता. म्हणून काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना वाचवण्यासाठी मी टांगा पलटी केला. असा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बजाजनगर येथे मंगळवारी (ता.7) रोजी जाहीर सभेत केला.
महाविकास आघाडीचे लोकसभा उमेदवार संदिपान भुमरे यांच्या प्रचारार्थ बजाजनगर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत भारतीय जनता पार्टी विकासाचे काम करत आहे. भारतीय जनता पार्टी संविधान संपवणार, अशी भाषा केली जात आहे. मात्र खरे खच्चीकरण काँग्रेसकडून केल्या जात आहे. बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकीत हरवण्याचे काम काँग्रेसने केले. 82 वेळा काँग्रेसने संविधानात बदल केला. भारतीय जनता पार्टीने संविधान दिन सुरू करून तो साजरा केला. महिलांना अर्ध्या तिकिटात एसटी प्रवास सुरू केला. त्यामुळे तोट्यात आलेली एसटी आज नफ्यात आहे.
संभाजीनगरच्या पाण्यासाठी दोन हजार कोटी रुपये दिलेत. आठशे कोटीचा महानगरपालिकेचा हिस्सा सुद्धा दिला. येत्या डिसेंबर पर्यंत ही योजना सुरू होईल. असे आश्वासन ही यावेळी मुख्यमंत्री यांनी दिले. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. आपल्याला पाणी मिळेल, विकास मिळेल. आणि म्हणून शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या संदिपान भुमरे यांना मतदान करा. खैरे यांना मत म्हणजे इम्तियाज जलील यांना मत, आणि भुमरे यांना मत म्हणजे मोदींना मत. आणि म्हणून येत्या 13 तारखेला प्रचंड मतांनी भुमरे यांना विजयी करा. असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.