वाळूजमहानगर – वाळुज परिसरातील युरेका इन्फोसिस स्कूल,बजाजनगरला सर्वोत्कृष्ट मोस्ट इमर्जिंग स्कूल ऑफ द इयर 2022 पुरस्काराने मुंबई येथे झालेल्या नुकत्याच एका कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. हॉटेल रेडिसन ब्लू, अंधेरी-मुंबई येथे एथॉस – मीमांसा स्कूल अवॉर्ड हा कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता.
युरेका इन्फोसिस स्कूल नेहमीच सामाजिकदृष्ट्या जबाबदार नागरिक विकसित करण्यासाठी काम करणारी शैक्षणिक संस्था आहे. युरेका इन्फोसिसने औरंगाबादच्या शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय सेवेचा गौरव म्हणून हा पुरस्कार देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम उपलब्ध करून देणाऱ्या युरेका इन्फोसिसच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक आहे. कोविड-19 महामारीच्या काळात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नासाठी युरेका इन्फोसिसची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. शैक्षणिक प्रतिष्ठा, शिक्षक उन्नती आणि कल्याण, सह-अभ्यासक्रम शिक्षण, क्रीडा शिक्षण आणि डिजिटल शिक्षण यासह अनेक मापदंडांचे मूल्यांकन केल्यानंतर तज्ञाकडून शाळेची निवड करण्यात आली.