वाळूजमहानगर, ता.20 – मोबाईलवर बोलत रस्त्याने जात असलेल्या एका कामगाराचा मोबाईल स्कावणाऱ्या आरोपीस वाळुज एमआयडीसी पोलिसांनी पकडून अटक केली. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता 24 डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सोनावण्यात आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळूज औद्योगिक वसाहतीतील कामगार सुनिल हरिशचंद्र बगुरे (वय 48) रा. सोलेगाव ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर हा 13 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास ओयासीस चौकातील राजपूत पेट्रोल पंपासमोरून मोबाईलवर बोलत जात होता. त्याचा मोबाईल स्कुटीवर आलेल्या अनोळखीने बळजबरीने हिसकावून घेवून पळून गेला. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात कलम 309 (4) भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना माहिती मिळताच गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी शोध घेवून आरोपी निखील रामदास गायकवाड, (वय 19), रा. नारायणपुर वाळुज ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर यास अवघ्या काही तासात ताब्यात घेवून त्याच्यावकडे विचारपूस केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून मोबाईल जप्त करण्यात आला असून आरोपीकडून मोबाईल चोरीचे इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वाळुज एमआयडीसी ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी वर्तवली आहे. आरोपीस प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट 19 वे छत्रपती संभाजीनगर यांनी (ता.24) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. ही कामगिरी पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उप आयुक्त नितीन बगाटे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय सानप, वाळुज एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, पोउपनि. विलास वैष्णव, पोह. बाळासाहेब आंधळे, पोअं. यशवंत गोबाडे, गणेश सागरे, नितीन इनामे, समाधान पाटील, जालिंदर रंधे, रवि गायकवाड, राजाभाऊ कोल्हे यांनी केली.