
बजाजनगर, (ता.22) – सोलापूर जिल्यातील मोठ्या पंढरपुरात साक्षात भगवंत परमात्मा आहेत. म्हणूनच भगवान शंकरानेही हातात त्रिशूळ व डमरू घेऊन पंढरपूरची वारी केली होती. पंढरपूरची वारी करण्यासाठी राज्यासह देश विदेशातून भाविक येतात. जगतगुरू संत तुकाराम महाराज अभंगातून म्हणतात की, सर्वस्व त्याग करून पंढरपूरची वारी करा. पंढरीची वारी ही मानवी जीवनातील सर्वश्रेष्ठ मिळकत आहे. त्यामुळे जीवनात एकदा तरी पंढरीची वारी कराच. जर आषाढी एकादशी सोहळ्याला मोठ्या पंढरपूरला काही कारणाने जाता आले नाही तर, निदान वाळूज महानगरातील तीर्थक्षेत्र असलेल्या छोट्या पंढरपूरची तरी वारी कराच. असे कळकळीचे आवाहन देवाची आळंदी येथील युवा कीर्तनकार ह.भ.प.भरत महाराज भोईटे यांनी वारकऱ्यांना केले. 
छत्रपती संभाजीनगर शहरापासून जवळच असलेल्या वाळूज महानगरातील पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सभागृहात आषाढी एकादशी अगोदरच्या योगिनी एकादशी निमित्त रविवारी 22 जून रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत ह. भ. प. भोईटे महाराजांचे हरि किर्तन उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. यावेळी महाराजांनी संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा
सुखे घेऊ जन्मांतरे/
एक बरे इहलोकी//१//
पंढरीचे वारकरी/
होता थोरी जोडी हे //२//
हे तो आले अनुभवा /
पहावे जीवा वरुनी //३//
तुका म्हणे केला त्याग/
सर्व संग म्हणऊनी//४//
हा अभंग किर्तन सेवेसाठी घेतला होता. या अभंगाचे निरूपण करतांना ह.भ.प. भोईटे महाराज कीर्तनात म्हणाले की, जीवनात सरपंच,सोसायटीचे चेअरमन,सभापती,आमदार होता आले नाही तरी चालेल, पण पंढरी चे वारकरी जरूर व्हा. जिवनात एकदा तरी पंढरीची वारी कराच. संतांची संगत धरा.संत तुकाराम महाराजांनी ‘जन्मासी येऊनी पंढरी पहावी’…या अभंगातून वारीचे महत्व विषद केले आहे. पंढरीच्या वारकऱ्याला मोक्षपदाला न्यायची जबाबदारी ही भगवंत परमात्म्याची आहे.त्यामुळे वारकऱ्यांनी आषाढी वारी चुकू देऊ नये असे आवाहन महाराजांनी केले.
प्रथम श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीस पहाटे महाभिषेक, संतपूजन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे माजी अध्यक्ष रत्नाकर शिंदे व युवराज शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या तर्फे सर्व भाविकांना साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. योगिनी एकादशी सोहळा यशस्वितेसाठी मंदिर कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र पवार, सचिव आप्पासाहेब झळके व सर्व विश्वस्त हरीश साबळे, रघुनाथ आदमाने, माधव महाराज सेनगावकर, गायनाचार्य जगन्नाथ महाराज थोरात, रमेश जाधव, मृदंगाचार्य दीपक महाराज कांबळे, टाळकरी छाया पवार, जिजाबाई जाधव, जिजाबाई घुले, नंदाबाई खुटेकर, सोनूबाई चव्हाण यांच्यासह वळदगाव व पंढरपूर येथील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. किर्तन प्रसंगी पंचक्रोशीतील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
