
वाळूजमहानगर, (ता.7) – वाळूज औद्योगिक वसाहतीतील साजापूर शिवारात असलेल्या स्टील व पाईप कंपनीत काम करणाऱ्याकडे कंपनीच्या मालकांनी 40 लाख रुपयांची रक्कम दिली असता ती त्याने घरात ठेवली होती. त्यानंतर त्याच्या साल्यानेच मेहुण्याच्या घरात डल्ला मारून रक्कम लंपास करून पळून गेला. दरम्यान वाळूज एमआयडीसी पोलिसांनी मध्य प्रदेशातून दोन आरोपींच्या मुस्क्या बांधून त्यांच्या ताब्यातून 40 लाख रुपये व गुन्ह्यात वापरलेला ऐवज जप्त केला.

मुकेश गोयल यांच्या वाळूज परिसरातील साजापुर शिवार येथील स्टील व पाईप कंपनीत काम श्रीवगतसिंह हिरसिंह राजपुत (वय 42) हे काम करतात. ते कुटुंबासह गुरुदक्षिणा अपार्टमेंट बिल्डींग नंबर 2, रुम नंबर 2, सिडको महानगर -1 तिसगाव येथे राहतात. 20 मे 2023 ते 27 मे 2023 या कालावधीत कंपनीच्या मालकांनी कंपनीचे वसुलीचे 40 लाख रुपये (चाळीस लाख रुपये) श्रीवगतसिंह हिरसिंह राजपुत यांच्याकडे दिले होते. ही रक्कम त्यांनी घरी एका बॅगेत ठेवली होती. दरम्यान 28 मे 2023 रोजी सकाळी 8 ते 8.30 वाजेच्या दरम्यान श्रीवगतसिंह राजपुत व त्याची पत्नी असे भाजीपाला खरेदी करण्यासाठी बाहेर गेले असता त्यांच्या घरी आलेला त्याचा साला दशरथसिंह कांतीसिंह राजपुत याने घरात कोणी नसल्याचा व मुले झोपल्याचा फायदा घेवुन कंपनीच्या वसुलीची घरात ठेवलेली चाळीस लाख रुपये रक्कम घेवुन पळुन गेला. 
याप्रकरणी दाखल असलेल्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी पोउपनि चेतन ओगले यांचेसह पोलीस पथक नेमुन वेळोवेळी मार्गदर्शन करुन गुन्ह्याचा पाठपुरावा करत गुप्त बातमीदाराच्या माहीतीवरुन मध्यप्रदेश पोलीसांच्या मदतीने पोलीस ठाणे दलौदा जि. मन्दसौर येथुन गुन्ह्यातील आरोपी दशरथसिंह कांतीसिंह राजपुत (वय 26) रा. रामचौक तहसिल राणीवाडा जि. जालौर, राजस्थान व प्रदिपकुमार जगदिश जोशी (वय 26) रा. गरबा चौक, तहसिल राणीवाडा जि. जालौर (राजस्थान) यांना अटक करुन त्यांच्याकडुन चोरलेल्या 40 लाख रुपयांपैकी 35 लाख 84 हजार (पस्तीस लाख चौऱ्याऐंशी हजार) रोख, 1 लाख रुपये (एक लाख रुपये) किंमतीची वॅगनार कार, 3 लाख रुपये (तीन लाख ) सोन्याचे अंगठी व चैन तसेच पाच मोबाईल असा एकुण 40 लाख 7 हजार रुपये (चाळीस लाख सात हजार ) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कामगीरी पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस उपआयुक्त दिपक गिऱ्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश आघाव तसेच विशेष पथक प्रमुख पोलीस उप निरीक्षक चेतन ओगले, पोलीस अंमलदार सुरेश कचे, अविनाश ढगे, सुरज अग्रवाल, हनुमान ठोके यांनी केली.
