
वाळूजमहानगर, (ता.24) – वाळूज येथील मेटल मॅन ऑटो कंपनीच्या वतीने वाळूज जवळील सारंगपूर येथे घेण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिरात 130 जणांची मोफत तपासणी करण्यात आली. त्यात सहा जणांना मोतीबिंदू आढळल्याने त्यांचे मोफत ऑपरेशन कंपनीच्या वतीने करून देण्यात येणार आहे.
वाळूज औद्योगिक वसाहतीतील मेटल मॅन ऑटो कंपनीच्या वतीने सामाजिक उपक्रम म्हणून विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून
मेटल मॅन ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक नवनीत जयरथ यांच्या 74 व्या वाढदिवसानिमित्त वाळूज औद्योगिक वसाहतीतील मेटलमॅन ऑटो व लॉयन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिर शनिवारी (ता.20) रोजी सारंगपूर ता. गंगापूर येथे आयोजित करण्यात आले होते. या नेत्र तपासणी शिबिरात गावातील 130 गरजूंनी डोळ्याची तपासणी करून घेतली. त्यातील मोतीबिंदू असलेल्या 6 रुग्णांचे मोफत ऑपरेशन मेटलमॅन ऑटो कंपनीच्या वतीने करून देण्यात येणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मेटलमॅन ऑटो कंपनीचे सीओओ श्रीकांत मुंदडा, प्लांट हेड प्रकाश एखंडे यांच्यासह सारंगपूरचे पोलीस पाटील संजय शिंदे, सरपंच ताराबाई चंद्रहार खरात, एकनाथ पारदे, श्रीमंत चापे, संजय पारदे, मुकेश खंडेलवाल आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नारायण निकम यांनी, सूत्रसंचालन योगेश चापे यांनी तर आभार अतुल भास्कर यांनी मानले.
