
वाळुज महानगर (वार्ताहर) – एका पावणे दोन वर्षाच्या मुलाला उचलून नेत असताना त्याची बहीण ओरडली. त्यामुळे घरातून आई धावत आली. आणि पाठलाग करून एकाला पकडले. त्यानंतर संतप्त महिला पुरुषांनी बेदम चोप दिला. मात्र पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. मुले चोरणारी टोळी आल्याच्या अफवेमुळे ही मॉब ब्लिचिंगची घटना बुधवारी 3 डिसेंबर रोजी सायंकाळी वाळूज येथे घडली.
याबाबत नागरिकांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळुज येथील रामराई रोडवरील घरासमोर वीस महिन्याचा मुलगा आणि त्याची मोठी बहीण खेळत होते. त्यावेळी तेथे एक जण गेटमधून आला त्याने त्या लहान मुलाला उचलले. त्याचवेळी मोठी बहीण आरडत घरात पळाली. तुमचा आवाज ऐकून तिची आई धावतच बाहेर आली असता तीन जण मुलाला घेऊन जाताना दिसले. त्यामुळे महिलेने आरडा ओरड करत त्यांचा पाठलाग केला. त्या महिलेच्या साथीला अन्य महिलाही धावल्या आणि त्यांनी एकाला पकडले. मात्र दोन जण पळून गेले. पकडलेल्या एका आरोपीस महिलांनी तेथेच बांधून ठेवले. दरम्यान घटनास्थळी मोठा जमाव जमला.
जमावाने बेदम चोपला –
पाठलाग करून महिलांनी पकडलेल्या एका आरोपीस संतप्त जमावाने बेदम सोप दिला. त्यामुळे त्याला बराच मार लागल्याने तो रस्त्याने विव्हळत हात पाय जोडत होता. दरम्यान रस्त्यावर मोठी गर्दी झाल्याने जो तो त्याला मारत होता.
पोलिसांची वेळीच धाव –
रामराई रस्त्यावर मोठा जमाव जमला. हा जमाव आरोपीला मारहाण करीत आहे. अशी माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. आणि जमावाची समजूत काढून शांत केले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. नसता मॉब ब्लिचिंग होऊन त्याचा जीव गेला असता. दरम्यान वाळूज पोलिसांनी आरोपीची चौकशी करून त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई केली.
आरोपी निघाले परप्रांतीय –
संतप्त जमावाच्या तावडीतून वाळूज पोलिसांनी सोडवून आणलेला आरोपी दारूच्या नशेत तर्रर्र होता. त्याची पोलिसांनी चौकशी करून नाव गाव विचारले असता त्याचे नाव करण असे त्याने सांगितले. तसेच पळून गेलेल्या आरोपीचे नावे मुन्ना असे सांगितले. त्यानंतर वाळूज पोलिसांनी मुन्ना व त्याच्या एका साथीदाराला बजाजकंपनीच्या पार्किंग गेटमधून पकडून आणले. हे सर्व आरोपी परप्रांतीय निघाले.
अफवांवर विश्वास ठेवू नका –
याबाबत वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मुले चोरणारी कोणतीही टोळी आलेली नाही. आमची रात्रदिवस गस्त असते. तसा प्रकार अद्यापही दिसून आला नाही. हा जो प्रकार घडला, तो केवळ अफवेमुळे घडला. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका. काही अनुचित प्रकार आढळला तर खात्री करा. पोलिसांची संपर्क साधा असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
